‘नमो शेतकरी महा सन्मान निधी’ बाबद एक महत्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने केंद्र सरकारच्या ‘किसान सम्मान योजनेच्या’ धर्तीवर महाराष्ट्रात नमो शेतकरी महा सन्मान निधी नावाने एका योजनेची घोषणा केली होती. या घोषणेची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने सदर योजना राबवण्यास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एक परिपत्रक जाहीर केले आहे. या परिपत्रकात ही योजना नेमकी अशी असेल, त्याची अंमलबजावणी कशी होईल आणि निधी वाटप कधीपासून सुरु होईल याची माहिती देण्यात आली आहे.
अनेक शेतकरी या योजनेच्या परिपत्रकाची वाट बघत होते आणि यावर कधी कारवाई सुरु होते याची विचारणा करत होते. चला तर जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती.
देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, त्यांच्या शेतीसंबंधी गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी त्यांच्या हातात पैसा खेळता राहावा म्हणून केंद्र सरकारने प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी ( PM-KISAN ) योजना 2019 साली सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिरिक्त अर्थसहाय्य करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. महाराष्ट्राचे वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2023-24 चा अर्थसंकल्प सादर करताना नमो शेतकरी महा सन्मान निधीची घोषणा केली होती.
शेतकर्यांना आर्थिक सहाय्य करणार्या 'नमो शेतकरी' योजनेमुळे...
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 17, 2023
Due to the 'Namo Shetkari' scheme, which gives financial assistance to the farmers...
किसानों को आर्थिक सहायता देने वाले 'नमो शेतकरी' योजना के कारण...
(Modi@9 - BJP #MahaJanSamparkAbhiyan , #Nanded | 10/6/23)… pic.twitter.com/TChuTY8eD6
कोणकोणते शेतकरी पात्र?
केंद्र सरकारने प्रधानमंत्री कृषी सन्मान निधीसाठी ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे असे सर्व शेतकरी ‘नमो शेतकरी महा सन्मान निधी’साठी पात्र ठरणार आहेत. तसेच वेळोवेळी PM-KISAN योजनेत केंद्र सरकारने पात्रतेच्या बाबतीत काही नियम बदलल्यास त्याची अंमलबजावणी या योजनेत देखील केली जाणार आहे. तसेच ज्यांनी नव्याने PM-KISAN पोर्टलवर नोंदणी केली आहे असे शेतकरी देखील या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.
योजनेची कार्यपद्धती
पी.एम.किसान योजनेच्या PFMS प्रणालीनुसार प्रत्येक हप्ता वितारणावेळी या योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीचा देखील फायदा घेता येणार आहे. या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना देण्यासाठी महाराष्ट्र सरकार एक स्वतंत्र पोर्टल विकसित करणार आहे. या पोर्टलच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा होणार आहेत. केंद्र सरकारच्या संमतीने पीएम किसान पोर्टल आणि नमो शेतकरी महासन्मान निधी पोर्टलचे एकत्रीकरण देखील केले जाणार आहे. ज्याद्वारे एकाच ठिकाणी दोन्ही योजनांची माहिती आणि हफ्त्यांची सद्यस्थिती शेतकऱ्यांना बघता येणार आहे.
कधी मिळेल निधी?
परिपत्रकात राज्य सरकारने ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ वाटपाचे वेळापत्रक देखील जाहीर केले आहे. यावर्षीच्या एप्रिल ते जुलै या 4 महिन्यांचा निधीचा पहिला हफ्ता शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. सध्या जून महिना सुरु आहे, त्यामुळे हा जून महिना आणि जुलै महिन्यापर्यंत शेतकऱ्यांना निधी वाटप केले जाणार आहे.
निधी वाटपाचा दुसरा टप्पा हा ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि तिसरा टप्पा डिसेंबर ते मार्च असा ठरवण्यात आला आहे. प्रत्येक टप्प्यात शेतकऱ्यांना 2000 रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.
राज्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबविण्यास शासन निर्णयानुसार एका स्वतंत्र प्रकल्प संनियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षामार्फत या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे.