मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्सने नुकताच 63000 अंकांचा टप्पा ओलांडला. सेन्सेक्सचा आजवरचा ऐतिहासिक स्तर आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने देखील 18700 अंकांची विक्रमी पातळी पार केली. सेन्सेक्स आणि निफ्टीमधील तेजीमागे अनेक घटक कारणीभूत आहेत.1990 मध्ये 1000 अंकांवर असणाऱ्या सेन्सेक्सला 63000 टप्पा पार करण्यात 31 वर्ष लागली. या तेजीने गुंतवणूकदारांना भरभरुन फायदा दिला.
शेअर बाजारात परदेशी गुंतवणूकदार, स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदार, म्युच्युअल फंडांकडून प्रचंड गुंतवणूक झाली आहे. म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून इक्विटीमध्ये SIP द्वारे होणाऱ्या गुंतवणुकीने आजवरचा रेकॉर्ड मोडला. दरमहा शेअर मार्केटमध्ये SIP च्या माध्यमातून 13000 कोटींची गुंतवणूक होत आहे. ज्यामुळे शेअर मार्केटमधील तेजीला बळ मिळाले आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीमधील तेजीने सर्व सामान्यांमध्ये कुतूहल जागरुक केले आहे. बाजारात सक्रिय गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तिगत गुंतवणूदारांचा आकडा झपाट्याने वाढत आहे.
परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) बाजारात प्रचंड खरेदीचा ओघ कायम ठेवला आहे. 30 नोव्हेंबर 2022 रोजी एफआयआयने 9000 कोटींचे शेअर खरेदी केले.एका दिवसात इतकी मोठी गुंतवणूक होण्याची चालू वर्षातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी 24 फेब्रुवारी 2022 रोजी परदेशी गुंतवणूकदारांनी 28739 कोटींची गुंतवणूक केली होती. सात वर्षांपूर्वी 21 एप्रिल 2015 रोजी परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर्समध्ये एकाच दिवशी 17488 कोटींची गुंतवणूक केली होती.
केंद्रात 2014 मध्ये सत्ताबदल झाल्यानंतर अर्थव्यवस्थेने भरारी घेतली. विकासाला चालना देणारी धोरणे राबवत केंद्रातील भाजप सरकारने गुंतवणूकदारांना आकर्षित केले. केंद्र सरकारचा आर्थिक सुधारणांचा धडाका सेन्सेक्स आणि निफ्टीसाठी बुस्टर डोस ठरला. दोन्ही निर्देशांकांनी विक्रमी झेप घेतली.या काळात हजारो स्टॉक्स मल्टीबॅगर बनले आणि त्यांनी गुंतवणूकदारांना मालामाल केले.