चीन विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सातत्याने वेगवेगळे प्रयोग करत आहे. अलीकडेच चिनी शास्त्रज्ञांनी क्लोनिंगद्वारे तीन 'सुपर गाय' तयार केल्याचा दावा केला आहे. या गायी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात 100 टन म्हणजेच 2 लाख 83 हजार लिटर दूध देऊ शकतात, असा शास्त्रज्ञांनी दावा केला आहे.
स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिन्ही गायींचे ब्रिडिंग नॉर्थवेस्ट युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी केले आहे. निंग्झिया परिसरात गेल्या दोन महिन्यांपूर्वी या वासरांचा जन्म झाला. हे सर्व नेदरलँडमधून आलेल्या होल्स्टेन फ्रिशियन गायीचे क्लोन आहेत.
Table of contents [Show]
जाणून घ्या, क्लोनिंग म्हणजे काय?
क्लोनिंग म्हणजे एका जीवातून दुसऱ्या जीवात अलैंगिक पद्धतीने जीव तयार करण्याची प्रक्रिया. सोप्या भाषेत, शास्त्रज्ञ प्राण्याचा डीएनए (DNA) घेतात आणि त्याच्या मदतीने प्राण्याचा नमुना तयार करतात. शास्त्रज्ञ त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या जनुकांमध्ये बदल करतात, ज्यामुळे सामान्य प्राण्यांपेक्षा अधिक शक्तिशाली प्राणी बनवता येतात.
Scientists successfully clone 'super cows' that produce a weird amount of #milk #cows #cloning #clone https://t.co/r75FKtbnab #Supercow #cows #cow #milk
— Jak Connor (@jakconnorTT) February 6, 2023
चीनने गायीचे क्लोन कसे केले?
प्रोजेक्ट लीड जिन यापिंग यांनी सांगितले की, सर्वप्रथम चांगल्या जातीच्या गायींच्या कानाच्या पेशी (Cells) काढण्यात आल्या. त्यानंतर यापासून भ्रूण तयार करून 120 गायींमध्ये त्या पेशींचे रोपण करण्यात आले. यातील 42% गायी गाभण झाल्या. या प्रयोगातून तीन सुपर गायींचा (Super Cow)जन्म झाला आहे, तर येत्या काही दिवसांत 17.5% वासरांचा जन्म होऊ शकतो.
एक सुपर गाय दरवर्षी 18 टन दूध देणार
शास्त्रज्ञांच्या मते, एक सुपर गाय एका वर्षात 18 टन (16.3 हजार लिटर) दूध देण्यास सक्षम आहे. हे अमेरिकेतील सामान्य गायीपेक्षा 1.7 पट जास्त आहे. येत्या 2-3 वर्षांत चीनमध्ये एक हजार सुपर गायींचे उत्पादन होईल, असे यापिंग सांगतात. याचा सर्वाधिक फायदा डेअरी उद्योगाला होणार आहे. सध्या चीनमध्ये दर 10,000 गायींपैकी फक्त 5 गायी त्यांच्या आयुष्यात 100 टन दूध देऊ शकतात. याशिवाय देशातील 70 टक्के दुभत्या गायी आयात केल्या जातात.
चीनमध्ये प्राण्यांचे क्लोनिंग वाढले
चीनने एखाद्या प्राण्याचे क्लोनिंग करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी, चिनी शास्त्रज्ञांनी जगातील पहिला क्लोन केलेला आर्क्टिक लांडगा तयार केला होता. 2017 मध्ये, चीनने गुरांचे क्लोन केले जे प्राण्यांमधील क्षयरोगाचा पराभव करू शकतात. अमेरिकेसह अनेक विकसित देशांमध्येही या तंत्रज्ञानावर सध्या काम सुरू आहे.