Krishi Udan scheme: कृषी मालाची जलद वाहतूक अन्नाची नासाडी रोखण्यासाठी अत्यंत गरजेची आहे. विशेषत: भाजीपाला, फळे यांची वाहतूक जर वेळेत झाली नाही तर माल खराब होतो. देशभरात कृषी मालाची जलद वाहतूक होण्यासाठी केंद्र सरकारने 'कृषी उडान' योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत देशभरातील विमानतळावरुन नाशवंत शेतीमाल भारतभर तसेच परदेशातही पोहचवला जातो. या योजनेला यश मिळत असल्याने आणखी 21 विमानतळांचा समावेश या योजनेत करण्यात येणार आहे.
नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आज कृषी उडाण योजनेचा विस्तार करणार असल्याची माहिती दिली. सध्या या योजनेअंतर्गत देशातील 31 विमानतळे आहेत. यामध्ये आणखी 21 विमानतळांचा समावेश करण्यात येणार आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असणारी विमानतळ कृषी माल वाहतुकीसाठी (Krishi Udan scheme) वापरण्यासाठी बोलणी सुरू असल्याचेही ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले. शेतमाल थेट विमानतळावर पोहचवून विमाने देशभर आणि जगभरात या योजनेंतर्गत पोहचवला जात आहे.
G20 प्रतिनिधींची कृषी विषयावर बैठक
भारताकडे सध्या G20 गटाचे अध्यक्षपद आहे. त्यामुळे भारतभर विविध विषयांवर बैठका सुरू आहेत. G20 प्रतिनिधींची कृषी विषयाबाबतची बैठक सध्या सुरू आहे. त्यामध्ये बोलताना ज्योतिरादित्य सिंधीया यांनी कृषी उडान योजनेच्या यशाबद्दल सांगितले. जलद वाहतूक फायद्याची ठरत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. अन्नाची नासाडी रोखण्यासाठी आणखी पायाभूत सुविधांची निर्मितीही करण्यात येत आहे.
फणस, द्राक्षे, लिंबू, भाजीपाला वाहतुकीसाठी विमानाचा वापर करण्यात येत आहे. ईशान्य भारतातील राज्यांमधून इतर राज्यात मालाची वाहतूक करणे वेळखाऊ आहे. त्यामध्ये मालही (perishable agri-produce) खराब होतो. विमान वाहतूक हा त्यावरील चांगला पर्याय आहे. जर्मनी, ब्रिटन, सिंगापूर, फिलिपाईन्स यासह अनेक देशांमध्ये थेट कार्गो विमानाने मालाची वाहतूक केली जाते. अन्नसुरक्षा, न्युट्रिशन, शाश्वत शेती, अन्न पुरवठा या महत्त्वाच्या विषयांवर G20 बैठकीत चर्चा करण्यात येते.
कोल्ड चैनच्या अभावामुळे अन्नाची नासाडी
कृषी माल साठवणुकीसाठी शीतगृहांची मोठ्या प्रमाणावर गरज भासते. मात्र, भारतामध्ये कृषी माल साठवणुकीच्या पायाभूत सुविधा उभ्या झाल्या नाहीत. त्यामुळे मालाची नासाडी होते. भाजीपाला, फळे जर शीतगृहात ठेवली तर जास्त काळ टिकतात. अन्यथा खराब होतात. लाखो टन माल वेळेत पोहचत नसल्याने खराब होत आहे. त्यावर विमान वाहतूक हा चांगला पर्याय आहे.