केंद्र सरकारने तब्बल दोन महिन्यांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा तेल कंपन्यांना एक मोठा धक्का दिला आहे. 2 महिन्यांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा पेट्रोलियम क्रूडवर विंडफॉल टॅक्स लागू करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर टेल कंपन्यांना अधिक कर भरावा लागणार आहे. याबाबत 14 जुलै रोजी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, देशांतर्गत क्रूड उत्पादनावरील विंडफॉल टॅक्स 1600 रुपये प्रति टन करण्यात आला आहे. याआधी त्यांच्याकडून कर घेतला जात नव्हता.
विंडफॉल टॅक्समधील बदल केल्यानंतर आता नवीन दर 15 जुलै 2023 म्हणजेच शनिवारपासून लागू करण्यात येणार आहेत. महत्वाचे म्हणजे पेट्रोल, डिझेल आणि एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (ATF) वरील विंडफॉल टॅक्स शून्य ठेवण्यात आला आहे.त्यामुळे त्यांच्या किमतीत सध्या तरी काही बदल पाहायला मिळणार नाहीये.
मे महिन्यात विंडफॉल कर शून्य
याआधी, 15 मे 2023 रोजी केंद्र सरकारने पेट्रोलियम क्रूडवरील विंडफॉल कर रद्द केला होता. मे महिन्यात 4,100 रुपये प्रति टन विंडफॉल टॅक्स आकारला जात होता, तो केंद्र सरकारने शून्यावर आणला होता. आता मात्र दोन महिन्यानंतर पुन्हा कर वाढवण्याचा सरकारचा निर्णय तेल कंपन्यासाठी अनपेक्षित होता.
विंडफॉल प्रॉफिट टॅक्स
भारतात पहिल्यांदा कच्च्या तेलाच्या उत्पादनांवर केंद्र सरकारने जुलै 2022 मध्ये विंडफॉल कर लागू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात पेट्रोल, डिझेल आणि एव्हिएशन टर्बाइन इंधन यांसारख्या उत्पादनांचाही समावेश होता. विंडफॉल प्रॉफिट टॅक्स म्हणजे ज्या तेल उत्पादक कंपन्या भारतात तेलावर प्रक्रिया करून देशाबाहेर विकतात आणि नफा कमावतात, त्या नफ्यावर लावलेला कर होय.
बऱ्याच तेल कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाची विक्री करून मोठा नफा कमवत होते,त्यावेळी देशांतर्गत उत्पादन देखील कमी होऊ लागले होते. अशा परिस्थितीत, नफ्याचे मार्जिन कमी करण्यासाठी सरकारने पेट्रोलियम क्रूड आणि इतर उत्पादनांवर विंडफॉल टॅक्स लादण्यास सुरुवात केली आहे.