CCI Penalty to Axis Bank: प्रतिस्पर्धा आयोगाने (CCI) देशातील आघाडीच्या खासगी क्षेत्रातील अॅक्सिस बँकेला 40 लाख रुपये दंड ठोठावला आहे. 2020 साली केलेल्या एका व्यवहाराची माहिती अॅक्सिस बँकेने प्रतिस्पर्धा आयोगाला दिली नव्हती. या प्रकरणी चौकशी सुरू होती. दरम्यान, बँक दोषी आढळल्याने दंडात्मक कारवाई करण्यात आली.
काय आहे प्रकरण?
अॅक्सिस बँकेने 2020 साली कॉमन सर्व्हिस सेंटर्सचे काम पाहणाऱ्या CSC e-governance या कंपनीचे 9.91% समभाग खरेदी केले होते. या व्यवहाराची माहिती बँकेने प्रतिस्पर्धा आयोगाला देणे आवश्यक होते. मात्र, अॅक्सिस बँकेने या व्यवहाराची कोणताही माहिती दिली नाही. त्यामुळे प्रतिस्पर्धा आयोगाने कारवाई केली.
कारवाई करण्यामागील कारण काय?
जेव्हा एखादी कंपनी दुसऱ्या व्यवसायात भागीदारी करते किंवा समभाग खरेदी करते तेव्हा त्याचा परिणाम कंपनीचे शेअर्स, गुंतवणुकादार आणि एकंदर भांडवली बाजारावर होत असतो. अशी माहिती संवेदनशील असते. त्यामुळे अचानक शेअर्सच्या किंमतीत बदल होऊ शकतो. त्यामुळे अशा व्यवहाराची माहिती प्रतिस्पर्धा आयोगाला 210 दिवस आधी देणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र, अॅक्सिस बँकेने याची माहिती दिली नव्हती.
गन जंपिंग म्हणजे काय? (What is Gun jumping )
एखादी कंपनी प्रतिस्पर्धा आयोगाला व्यवहाराची माहिती न देता समभाग खरेदी करते तेव्हा त्यास "गन जंपिंग" असे म्हटले जाते. असे व्यवसाय नियामक संस्था बेकायदेशीर ठरवते. प्रतिस्पर्धा कायद्यातील 43A नुसार बँकेने समभाग खरेदीची माहिती द्यायला हवी होती. मात्र, ही माहिती न दिल्याने कारवाई केल्याचे CCI ने म्हटले आहे.
अॅक्सिस बँकेने CSC e-governance चे समभाग व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने खरेदी केले की फक्त गुंतवणूक म्हणून केले हे व्यवहारातून स्पष्ट होत नसल्याचे म्हटले आहे. मागील काही वर्षात "गन जंपिंग" च्या प्रकरणात वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांवर प्रतिस्पर्धा आयोगाने दंडात्मक कारवाई केली आहे.