बायजू (Byju's) हे एक शैक्षणिक प्लॅटफॉर्म असून एडटेक ही मूळ कंपनी आहे. मागच्या काही काळापासून कंपनी चर्चेत आहे. आता तर कंपनीनं अख्खं कार्यालयच खाली केलं आहे. खर्च कपात (Cost saving) करण्याचं कारण यासाठी पुढे केलं आहे. मागे कंपनीनं आपल्या विविध विभागातल्या कर्मचाऱ्यांना घरी (Job cut) पाठवलं. त्यावेळीदेखील खर्चकपात हेच कारण देण्यात आलं होतं. आता बेंगळुरूतलं सर्वात मोठं असणारं ऑफिस रिकामं करण्यात आलं आहे. फंडिंगची (Funding) समस्या हेदेखील यामागे एक कारण सांगितलं जात आहे.
बेंगळुरूत एकूण 3 कार्यालयं
कर्नाटकातल्या बेंगळुरूमध्ये कंपनीची एकूण 3 ऑफिसेस आहेत. त्यातलं हे सर्वात मोठं ऑफिस होतं. कल्याणी टेक पार्क याठिकाणी 5.58 लाख स्क्वेअर फुटाच्या परिसरात हे ऑफिस आहे.हे तर रिकामं झालं आहेच. मात्र यासोबत आणखी एक कार्यालय जे प्रेस्टीज टेक पार्क या परिसरात आहे, त्यातला काही भागदेखील रिकामा केला असल्याचं काही रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं आहे.
कंपनीच्या प्रवक्त्याची माहिती
प्रेस्टिज पार्क या परिसरातलं कार्यालय एकूण 9 मजल्यांचं आहे. त्यातले दोन मजले कंपनीनं खाली केले आहेत. याठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय देण्यात आला आहे. कंपनीच्या प्रवक्त्यानं यासंदर्भात माहिती दिली. देशभर कंपनीची मिळून एकूण 30 लाख स्क्वेअर फुटाची ऑफिसेस आहेत. व्यवसायाची प्राथमिकता आणि वर्किंग पॉलिसीज या आधारावर ऑफिसच्या जागेचा निर्णय घेण्यात येतो, असं त्यांनी सांगितलं.
पीएफचा घोळ
बायजूमधल्या कर्मचाऱ्यांना पीएफचे पैसेदेखील मिळालेले नसल्याचं समोर आलं आहे. कंपनीतल्या 738 कर्मचाऱ्यांनाच पीएफचं कॉन्ट्रिब्यूशन करण्यात आलं. मागच्या महिन्यात 25000 कर्मचाऱ्यांना पीएफचे पैसे देण्यात आले. याचवेळी जेव्हा पीएफ देण्यात उशीर होत असल्याच्या बातम्या आल्या त्यानंतर कंपनीनं 24,818 कर्मचाऱ्यांना हे हक्काचे पैसे दिले. जानेवारी, फेब्रुवारी, मात्र या महिन्यात 10,000 ते 13,000 कर्मचाऱ्यांना पीएफचे पैसे देण्यात आले तर एप्रिल आणि मे महिन्यात मात्र हे पैसे अद्याप पेंडिंग आहेत.