Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

BYJU's layoffs: 'बायजू'मध्ये पुन्हा नोकरकपात, हजारो कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड

BYJU's layoffs: 'बायजू'मध्ये पुन्हा नोकरकपात, हजारो कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड

Image Source : www.facebook.com

BYJU's layoffs: बायजूमधल्या कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. आतापर्यंत विविध टप्प्यात बायजूनं मोठी नोकरकपात केली होती. मात्र अजूनही कर्मचाऱ्यांना कमी करण्याची मालिका कायम आहे. आताही मोठी नोकरकपात बायजू करणार आहे.

खर्च कमी करण्याची कारणं पुढे करून कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्याचा सोपा मार्ग सध्या अनेक कंपन्या अवलंबत आहेत. आयटी, ई कॉमर्स तसंच इतर विविध कंपन्यांनी मागच्या वर्षभरात कमी केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या लाखांत आहे. अजूनही कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना घरी पाठवत आहेत. बायजू हे शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित एडटेक स्टार्टअप (Edtech's BYJU'S) आहे. आधीही कंपनीनं अनेकांना घरी पाठवलं होतं.

तोटा कमी करण्याचं कारण

तोटा कमी करण्यासाठी बायजू जवळपास 1000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार असल्याचं एका रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. बायजूच्या सेल्स आणि मार्केटिंग टीमला कंपनीच्या या निर्णयाचा सर्वाधिक फटका बसणार असल्याचा दावा मॉर्निंग कॉन्टेक्स्टनं केला आहे. शेवटच्या फंडिंग राउंडमध्ये त्याचं मूल्य 22 अब्ज डॉलर होतं.

कर्जदात्यांविरुद्ध खटला

कंपनीनं नोव्हेंबर 2021मध्ये यूएसमध्ये उभारलेल्या 1.2 बिलियन अमेरिकन डॉलरच्या टर्म लोन बीच्या कर्जदात्यांविरुद्ध खटला दाखल केला आहे. या प्रकरणाचा निपटारा होईपर्यंत आणखी कोणतंही व्याज देणार नसल्याचंदेखील कंपनीनं म्हटलं आहे.

निवेदनात काय?

यूएस 1.2 बिलियन अमेरिकन डॉलरच्या टर्म लोन बीला (TLB) आव्हान देण्यासाठी ही निर्णायक कारवाई केलीय. रेडवुड कॅपिटल मॅनेजमेंटला अपात्र ठरवण्यासाठी न्यूयॉर्क सर्वोच्च न्यायालयात तक्रारही दाखल करण्यात आली आहे, असं कंपनीनं आपल्या निवेदनात म्हटलंय. कंपनीची मालमत्ता जप्त करण्याची धमकी देणं आणि कर्जाची लवकर परतफेड करण्याची मागणी करणं या बाबींचा यात समावेश आहे, असं कंपनीचं मत आहे.

आधीही केली होती कर्मचारी कपात

बायजूनं काही आता पहिल्यांदाच नोकरकपात केलेली नाही. या वर्षाच्या सुरुवातीला कंपनीनं जवळपास 1,500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं होतं. खर्च आणि ऑपरेशन्सचं कारण त्यावेळी कंपनीनं दिलं होतं. बायजूच्या या निर्णयाचा फटका अनेक विभागांना बसल्याचंदेखील समोर आलं होतं. मिंटनं या संदर्भातलं वृत्त दिलं.

बायजू रवींद्रन यांनी पाळला नाही शब्द

नियोजित 2,500 कर्मचार्‍यांच्या पलीकडे आणखी कोणतीही नोकरकपात केली जाणार नाही, असा विश्वास बायजूचे संस्थापक आणि सीईओ बायजू रवींद्रन यांनी ऑक्टोबरमध्ये कर्मचाऱ्यांना दिला होता. मात्र आपलं आश्वासन पूर्ण करण्यात रवींद्रन सपशेल अपयशी ठरले आहेत. मेमध्ये ब्लॅकरॉकनं एडटेक प्रमुख बायजूचं मूल्य 8.29 अब्ज डॉलर कमी केलं.

कायदेशीर अडचणींचाही करावा लागत आहे सामना

या वर्षातल्या एप्रिल महिन्यात बायजूवर अंमलबजावणी संचालनालयानं धाड टाकली होती. विदेशी चलन कायद्याचं उल्लंघन केल्याचं ईडीचं म्हणणं होतं. त्या पार्श्वभूमीवर कंपनीशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे ईडीनं जप्त केली होती. यावेळी ईडीनं बायजू कंपनी त्याचप्रमाणे कंपनीशी संबंधित परिवारांची चौकशी केली होती. मात्र ही नियमित चौकशी असल्याचं त्यावेळी बायजू रवींद्रन यांनी म्हटलं होतं.

नोकरकपातीचा ट्रेंड

या वर्षात विविध कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये कपात केली. यात अ‍ॅमेझॉन, ट्विटर, मेटा (फेसबुक), अ‍ॅसेंचर, अलिबाबा अशा विविध कंपन्यांचा यात समावेश आहे. सर्वच कंपन्या तोटा कमी करण्याचं कारण पुढे करत आहेत. जॉब गमावलेल्यांना मात्र अनेक अडचणींचा सामना यानिमित्तानं करावा लागतो.