भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) लवकरच 5G सेवा सुरु करणार आहे. देशभरातील 1.37 लाख टॉवर्सचे 4G मधून 5G मध्ये परिवर्तन होणार असून बीएसएनएल ग्राहकांना 5G सेवा मिळेल, असे दूरसंचार मंत्री अश्विन वैष्णव यांनी सांगितले. पुढील पाच ते सात महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
दूरसंचार क्षेत्रात बीएसएनलला अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यासाठी भक्कम निधीची तरतूद करण्यात आली आहे. बीएसएनएलचा विकास निधी वार्षिक 500 कोटींवरुन 4000 कोटी करण्यात आला असल्याचे वैष्णव यांनी सांगितले. टेलिकॉम क्षेत्रातील स्पर्धेत बीएसएनएल मागे राहू नये यासाठी खास प्रयत्न करण्यात आले आहेत. 5G सेवेबाबत बीएसएनएल गंभीर आहे. विद्यमान 4G सेवेचे टप्प्याटप्यात 5G मध्ये परिवर्तन केले जाणार असल्याची माहिती वैष्णव यांनी दिली. बीएसएनएलला आवश्यक ती 5G तंत्र सामुग्री पुरवण्यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीशी संपर्क केला असल्याचे त्यांनी सांगितले.
बीएसएनएलचे देशभरात 135000 मोबाइल टॉवर आहेत. कंपनीचे ग्रामीण आणि दुर्गम भागात मजबूत नेटवर्क आहे. मात्र अजून देशातील अतिदुर्गम भाग दूरसंचार सेवेपासून वंचित आहे. अशा ठिकाणी मोबाईल सेवा पोहोचवणे आवश्यक आहे, असे वैष्णव यांनी सांगितले.
दूरसंचार क्षेत्रात सध्या दोन मोठ्या कंपन्यांचे वर्चस्व आहे, मात्र बीएसएनएलचा देखील वेगळा ग्राहक वर्ग आहे. या ग्राहकांना खासगी कंपन्यांप्रमाणे सेवा देण्यासाठी बीएसएनएल प्रयत्न करेल. देशभरातील 135000 टॉवर्सचे 5G मध्ये परिवर्तन केल्यानंतर ही सेवा वेगवान होईल, असे त्यांनी सांगितले.