लंडनमधल्या वाहतूक पोलिसांनी पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांना वाहतुकीचे नियम न पाळल्याबद्दल नोटीस बजावली आहे. सुनक आपल्या कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टी (Conservative Party) या राजकीय पक्षासाठी सोशल मीडिया व्हीडिओ बनवत होते. त्यासाठी ते गाडीत मागच्या सीटवर बसले होते. पण, ग्रेट ब्रिटनमध्ये गाडीत सीटबेल्ट वापरणं अनिवार्य आहे. आणि नेमकं तेच ऋषी सुनक विसरले. त्यांनी सीट बेल्ट (Seat Belt) लावला नव्हता. त्यामुळे हा व्हीडिओ इन्स्टाग्रामवर (Instagram) प्रसिद्ध झाल्यावर लँकेशायर पोलिसांनी ताबडतोब त्यांच्यावर नोटीस बजावली.
लँकेशायर पोलिसांनी (Lancashire Police) आपल्या ट्विटर हँडलवर त्याविषयी माहितीही दिली आहे. त्यात ते म्हणतात, ‘आम्ही लंडनच्या एका 42 वर्षीय इसमावर सीटबेल्ट न लावल्यामुळे Fixed Penalty वसुलीची नोटीस बजावली आहे.’ हे 42 वर्षीय इसम म्हणजेच पंतप्रधान ऋषी सुनक आहेत, हे त्यांनी सूज्ञपणे लपवलं आहे.
सक्तीचा दंड याचा अर्थ ऋषी सुनक यांना कोर्टासमोर हजर राहावं लागणार नाही. फक्त दंड भरून यातून सुटका करून घेता येईल. सीटबेल्ट न लावण्याच्या गुन्ह्यासाठी लंडनमध्ये साधारणपणे 100 पाऊंड इतका दंड आकारण्यात येतो.
डाऊनिंग स्ट्रीट या पंतप्रधानांच्या निवासस्थानातून लगेचच एक मीडिया पत्रक काढण्यात आलं. आणि यात, पंतप्रधानांनी आपली चूक मान्य केली असल्याचं नमूद करण्यात आलंय. त्याच प्रमाणे तो व्हीडिओ सोशल मीडियावरन काढून टाकल्याचंही त्यांनी सांगितलंय.
सरकारी पद भूषवत असताना सुनक यांनी केलेली ही दुसरी चूक
बीबीसी या सरकारी मीडियानेही झालेल्या प्रकाराची सविस्तर माहिती दिली आहे. त्यांच्या मते, ‘सक्तीचा दंड असल्यामुळे हे प्रकरण 100 पाऊंडांत मिटेल. पण, तेच कोर्टात गेलं तर सुनक यांना 500 पाऊंड भरायला लागू शकतात.‘ बीबीसीवर झालेल्या वार्तांकना दरम्यान सुनक यांचा तो व्हीडिओही आपल्याला पाहता येतो.
मागच्या गुरुवारी सुनक यांनी हा व्हीडिओ शूट केला आहे. लंडनहून लँकेशायरला निघालेले असताना सुनक गाडीच्या मागच्या सीटवर बसले आहेत. आणि मुलाखतीत ते लँकेशायर प्रांताच्या विकासासाठी त्यांनी आखलेल्या योजनांची माहिती देत होते. कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टी आणि त्यांच्या स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हीडिओ टाकण्यात आला होता. पण, आता तो मागे घेण्यात आलाय.
अलीकडे सुनक यांनी केलेल्या काही सरकारी दौऱ्यांवरून त्यांच्यावर बरीच टीका झाली आहे. कारण नसताना छोटे-छोटे दौरे करणं आणि त्यासाठी जेट वापरणं यासाठी विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
सार्वजनिक नियम मोडण्याचीही सुनक यांची ही ठळक दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2020 मध्ये डाऊनिंग स्ट्रीट इथं झालेल्या एका पार्टी दरम्यान सोशल डिस्टन्सिंगचा नियम मोडल्या प्रकरणी पोलिसांनी त्यांना दंड ठोठावला होता. तेव्हा ते मध्यवर्ती बँकेचे चॅन्सेलर होते. आता झालेल्या कारवाईचीही युके आणि जगभरातही चर्चा होतेय. सुनक यांनी दंड भरणार असल्याचं स्पष्ट केलंय.