अमेरिकेची विमान कंपनी बोइंगने मोठी कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल 2000 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढण्याचा निर्णय बोइंग प्रशासनाने घेतला आहे. वित्त विभाग, मनुष्यबळ विभागातील कर्मचाऱ्यांना आपली नोकरी गमवावी लागणार आहे. दुसऱ्या बाजूला कंपनी यातील एक तृतीयांश कर्मचाऱ्यांचे काम आऊटसोर्स करणार आहे.
बोइंगने कर्मचारी कपातीला दुजोरा दिला आहे. कॉर्पोरेट स्ट्रक्चर सोप आणि सुटसुटीत करण्याचा कंपनी प्रयत्न करत आहे. त्यानुसार दोन हजार कर्मचाऱ्यांची गच्छंती करण्यात येणार आहे. या कर्मचाऱ्यांपैकी एक तृतीयांश मनुष्यबळाचे काम भारतातील आघाडीची आयटी कंपनी टाटा कन्स्लटन्सी सर्व्हिसेसकडून केले जाणार आहे.
गेल्या वर्षी बोइंगने 150 कर्मचाऱ्यांची कपात केली होती. कंपनीने पुन्हा 2000 कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी बोइंगचा शेअर 0.4% ने घसरला होता. बोइंगने भारतीय बाजारपेठेवर लक्ष केंद्रीत केले आहे. भारतात आपले स्थान बळकट करण्यासाठी कंपनी 300 हून अधिक पुरवठादारांना जोडणार आहे.
मायक्रोसॉफ्टने गेल्या महिन्यात 11 हजार कर्मचारी काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या या घोषणेचा हजारो कर्मचाऱ्यांवर परिणाम होऊ शकतो. यूएस तंत्रज्ञान क्षेत्रातील ही मोठी कपात असेल.अॅमेझॉन आणि मेटा यांच्यासह अनेक टेक कंपन्यांनी मागणी मंदावल्यामुळे आणि जागतिक आर्थिक दृष्टीकोन बिघडल्याला प्रतिसाद देत काम बंद केले आहे. 30 जूनपर्यंत, मायक्रोसॉफ्टचे 2 लाख 21 हजार पूर्णवेळ कर्मचारी होते. यामध्ये युनायटेड स्टेट्समधील 1 लाख 22 हजार आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर 99 हजार कर्मचारी होते.