नुकताच सादर करण्यात आलेल्या मुंबई महानगर पालिकेच्या अर्थसंकल्पात भाजपच्या माजी नगरसेवकांना तीन कोटींची विकास निधी देण्यात आला आहे. पालिकेच्या बजेटमध्ये सत्ताधारी शिवसेना ठाकरे गट आणि इतर पक्षांच्या नगरसेवकांना यातुलनेत केवळ एक कोटींचा निधी दिल्याने निवडणुकीपूर्वीच वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. (BJP Corporators get huge development funds in budget)
महापालिकेची मुदत गेल्यावर्षी मार्च 2022 मध्ये संपली असून सरकारने पालिकेवर प्रशासकाची नेमणूक केली आहे. प्रशासक म्हणून इक्बाल सिंग चहल (Iqbal Singh Chahal) हे कारभार पाहत आहेत. महापालिकेची निवडणूक प्रस्तावित असताना या महिन्याच्या सुरुवातीला पालिका प्रशासनाने हंगामी किंवा चार महिन्यांचे बजेट सादर न करता पूर्ण बजेट सादर केले होते. महापालिकेने आर्थिक वर्ष 2023-24 साठी 52619.07 कोटींचा आजवरचा सर्वात मोठा अर्थसंकल्प सादर केला होता.
कोणतीही करवाढ नसल्याने सामान्य मुंबईकरांना दिलासा मिळाला होता. गेल्या वर्षी पालिकेच्या बजेटचे आकारमान 45949.21 कोटी इतके होते. गेल्या वर्षात पालिकेचे उत्पन्न कमी झाले असले तरी यंदाच्या बजेटमध्ये मुंबईकरांवर कोणतीही करवाढ करण्यात आली नाही. प्रकल्प आणि इतर खर्चासाठी ठेवी आणि राखीव निधीमधील 18746 कोटींचा निधी अंतर्गत हस्तांतर सुविधेतून वापरण्यात येणार असल्याचे पालिकेचे प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी म्हटले होते.
पालिकेकडून नगरसेवकांना त्यांच्या प्रभागात विकास कामे करण्यासाठी विकास निधी आणि नगरसेवक निधी मंजूर केला जातो. यंदाच्या अर्थसंकल्पात नगरसेवकांसाठी एकूण 142.20 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 227 नगरसेवक आणि 10 नामनिर्देशित नगरसेवकांना प्रत्येकी 60 लाखांचा निधी मिळणार आहे. मात्र बजेटमधील तपशीलानुसार भाजप नगरसेवकांना प्रत्यक्षात इतर नगरसेवकांच्या तुलनेत तीन पट अधिक निधीची तरतूद करण्यात आली आहे. भाजप नगरसेवकांना तब्बल तीन कोटी रुपयांच्या विकास निधीची तरतूद बजेटमध्ये करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. भाजप नगरसेवकांना प्रत्येकी तीन कोटींचा निधी देण्यात आल्याने इतर पक्षांच्या नगरसेवकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. पालिका प्रशासनाने मात्र ज्या पक्षांच्या गटनेत्यांची निधीची मागणी करणारी पत्रे प्राप्त झाली त्यांनाच वाढीव निधी दिला असल्याचे म्हटले आहे.
Table of contents [Show]
- शिक्षण विभागाच्या अर्थसंकल्प 23 कोटींनी कमी केला (Education Budget Cut By 23 Crore)
- भाजप नगरसेवकांना मिळाला एकूण 231 कोटींचा निधी (BJP gets 231 Crore Fund from Budget)
- नगरसेवकांना विकासनिधी कसा मिळतो, काय आहे पद्धत (Procedure For Demands and Funds)
- यंदा पालिकेचे उत्पन्न कमी होणार (BMC Income may fall)
शिक्षण विभागाच्या अर्थसंकल्प 23 कोटींनी कमी केला (Education Budget Cut By 23 Crore)
पालिकेने शिक्षण विभागाच्या अर्थसंकल्प 23 कोटींनी कमी केला आहे. 2022-23 च्या अर्थसंकल्पात शिक्षणासाठी 3,370.24 कोटी रुपयांचा अंदाज व्यक्त केला होता. तर 2023-24 या आर्थिक वर्षात मागील वर्षाच्या तुलनेत 23 कोटींनी घट केली असून तो 3,347.13 कोटी रुपये अंदाजित केला आहे.
भाजप नगरसेवकांना मिळाला एकूण 231 कोटींचा निधी (BJP gets 231 Crore Fund from Budget)
पालिकेच्या बजेटमध्ये भाजपच्या नगरसेवकांना विकास कामांसाठी एकूण 231 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. भाजप गटनेत्याने जानेवारी महिन्यात 77 प्रभागांतील विकास कामांसाठी वाढीव निधीचे मागणी देणारे पत्र पालिका प्रशासकांना दिले होते. त्यानुसार प्रत्येक प्रभागासाठी 3 कोटींप्रमाणे एकूण 231 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. भाजप नगरसेवकांना 77 प्रभागांसाठी एकूण 231 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यावरुन सत्ताधारी आणि पालिका प्रशासक यांच्या वाद वाढण्याची शक्यता आहे.
नगरसेवकांना विकासनिधी कसा मिळतो, काय आहे पद्धत (Procedure For Demands and Funds)
- मुंबई महापालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते.
- महापालिकेच्या नगरसेवकांना दरवर्षी 60 लाख रुपयांचा विकास निधी दिला जातो.
- पालिकेचे 227 नगरसेवक असून 10 नामनिर्देशित नगरसेवक आहेत.
- बजेट तयार करण्यापूर्वी नगरसेवकांना प्रभागात कोणती कामे करायची आहेत याबाबत पालिका प्रशासनाला पत्र द्यावे लागते.
- प्रभाग प्रस्तावित कामे आणि त्यांचा अंदाजित खर्च तसेच विकास निधीबाबत मागणी लेखी मागणी करावी लागते.
- बजेट सादर झाल्यानंतर त्याला स्थायी समितीची मंजुरी घ्यावी लागते.
यंदा पालिकेचे उत्पन्न कमी होणार (BMC Income may fall)
पालिकेच्या इतिहासात आतापर्यंतचा सर्वात मोठा अर्थसंकल्प असून यात पहिल्यांदाच भांडवली खर्चाची तरतूद बजेटच्या तुलेनत 50% अधिक असल्याचे चहल यांनी स्पष्ट केले. 31 डिसेंबर 2022 अखेर पालिकेला 18769.28 कोटींचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. त्यात सुधारित अंदाजानुसार 1855.98 कोटींनी उत्पन्न कमी आहे.