मुंबई महापालिकेने आर्थिक वर्ष 2023-24 साठीचा अर्थसंकल्प आज शनिवारी 4 फेब्रुवारी 2023 रोजी सादर केला. पालिकेने आतापर्यंतचा सर्वात मोठा बजेट सादर केला असला तरी अग्निशमन विभागासाठीची (Mumbai Fire Brigade-MFB) तरतूद बजेटच्या एकूण आकारमानापेक्षा 1% हून कमी आहे. मुंबई पालिकेने आज शनिवारी 4 फेब्रुवारी 2023 रोजी आर्थिक वर्ष 2023-24 साठीचा 52619.07 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बजेटमध्ये 14.52% वाढ झाली. मात्र मुंबईकरांच्या अग्निसुरक्षेबाबत बजेटमध्ये खूपच कमी तरतूद केल्याने पालिका प्रशासन उदासीन असल्याचे दिसून आले.
मुंबईत दररोज आगीच्या घटना घडतात. अनेकदा दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये आग लागल्यास अग्निशमन दलाला मर्यादा येतात. गगनचुंबी इमारतींसाठी उंच शिडी असेलेली मर्यादित वाहने अग्निशमन दलाच्या ताफ्यात आहेत. फायर इंजिन थेट आगीच्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ते किंवा सोयी सुविधा नसल्याने अनेकदा अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवताना कसरत करावी लागते.
अग्निशमन दलात अत्याधुनिक वाहने, आधुनिकीकरण यासाठी पालिकेने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये अग्निशनम विभागासाठी 227.07 कोटींची तरतूद केली आहे. गेल्या अर्थसंकल्पात अग्निशमन दलाकरिता 300 कोटी आणि केंद्राची उभारणी आणि दुरुस्तीसाठी 65.54 कोटींची तरतूद करण्यात आली होती. मात्र यंदा त्यात 30% कमी निधी देण्यात आला आहे.
बजेटमध्ये अग्निशमन विभागाला दिलेल्या त्रोटक निधीबाबत प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल यांना विचारले असता त्यांनी सांगितले की अग्निशमन दलाच्या आधुनिकीकरणासाठी प्रयत्न सुरु आहेत. यंदाच्या बजेटमध्ये अग्निशमन विभागाने पालिका प्रशासनाकडे केलेली आर्थिक मागण्या पूर्ण केल्याचे चहल यांनी सांगितले.
मुंबई अग्निशमन दलाकडून यंदा 900 अग्निशमन जवानांची भरती केली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया सुरु आहे. यातील 30% जागा या महिलांसाठी राखीव आहेत.
दररोज मुंबईत 10 ते 12 आगीच्या घटना
मुंबई शहर आणि उपनगरात दररोर सरासरी 10 ते 12 आगीच्या घटना घडतात. वर्षाचा विचार केला तर सरासरी 40 ते 42 हजार आगीच्या घटना घडतात. यात मालमत्तेचे नुकसान होते तसेच जिवीतहानी देखील होते. महापालिकेची स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा आहे. अग्निशमन दलात 2500 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा ताफा आहे. मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाची 35 अग्निशनम केंद्र आहेत. 18 मिनी फायर स्टेशन्स असून 6 फायर कमांड सेंटर्स आहेत. अग्निशमन दलाकडे 258 वाहने असून यात फायर इंजिन्स, जम्बो वॉटर टॅंकर्स आणि लॅडर व्हॅनचा समावेश आहे.