Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

BMC Budget 2023 Highlights: करवाढ नसलेला BMC चा आजवरचा सर्वात मोठा अर्थसंकल्प मात्र आरोग्य-शिक्षणाच्या निधीला कात्री

BMC Budget 2023

BMC Budget 2023 Highlights: देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेने वर्ष 2023-24 साठीचा 52 हजार कोटींचा अर्थसंकल्प आज शनिवारी 4 फेब्रुवारी 2023 रोजी सादर केला. यंदाही बजेटमध्ये कोणतीही करवाढ नसल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला.

निवडणूक कार्यक्रम लांबलेला असतानाच मुंबई महापालिकेने आज शनिवारी 4 फेब्रुवारी 2023 रोजी आर्थिक वर्ष 2023-24 साठीचा अर्थसंकल्प सादर केला. पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच 52619.07 कोटींचे महाकाय बजेट सादर करण्यात आले. यंदा बजेटमध्ये गत वर्षाच्या तुलनेत 14.52% वाढ करण्यात आली. गेल्या वर्षी पालिकेच्या बजेटचे आकारमान 45949.21 कोटी इतके होते. गेल्या वर्षात पालिकेचे उत्पन्न कमी झाले असले तरी यंदाच्या बजेटमध्ये मुंबईकरांवर कोणतीही करवाढ करण्यात आली नाही. मात्र बजेटमधील खर्चाची भूक भागवण्यासाठी पालिकेच्या ठेवी आणि राखीव निधीमधील 18746 कोटींचा निधी अंतर्गत हस्तांतर सुविधेतून वापणार असल्याचे बजेटमध्ये नमूद करण्यात आले आहे.(BMC Present 52619.07 crore budget today no tax increased) 

मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांनी प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल यांच्याकडे आर्थिक वर्ष 2023-24 साठीचे बजेट सादर केले. तत्पूर्वी अतिरिक्त महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी पालिकेच्या शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प प्रशासकांकडे सादर केला. निवडणूक प्रस्तावित असताना देखील पालिका प्रशासनाने हंगामी किंवा चार महिन्यांचे बजेट सादर न करता पूर्ण बजेट सादर केले.

मुंबईकरांवर करवाढ नाही (No Tax Hike in Budget)

बजेटमध्ये मुंबईकरांवर कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे सामान्य मुंबईकरांना दिलासा मिळाला. मुंबईतील पायाभूत सेवांसाठी भरीव तरतूद करतानाच नव्याने अनेक प्रकल्प हाती घेण्यात आल्याचे पालिकेचे प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले. पालिकेच्या इतिहासात आतापर्यंतचा सर्वात मोठा अर्थसंकल्प असून यात पहिल्यांदाच भांडवली खर्चाची तरतूद बजेटच्या तुलेनत 50% अधिक असल्याचे चहल यांनी स्पष्ट केले. 31 डिसेंबर 2022 अखेर पालिकेला 18769.28 कोटींचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. त्यात सुधारित अंदाजानुसार 1855.98 कोटींनी उत्पन्न कमी आहे.

आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, पारदर्शक व्यवहार या प्राथमिकता

पालिका प्रशासनासमोर आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि पारदर्शक व्यवहार या प्रमुख प्राथमिकता असल्याचे डॉ. चहल यांनी सांगितले. बजेटमध्ये नागरिकांनी केलेल्या बहुतेक सूचनांचा विचार करुन उपाय योजना करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र आरोग्य आणि शिक्षणासाठीच्या खर्चात यंदा कपात करण्यात आली. आरोग्यासाठी 6309 कोटी रुपयांची तरतूद केली असून पालिकेने शिक्षणासाठी 3347 कोटींची तरतूद केली आहे. शिक्षणासाठीची तरतूद यंदा 23 कोटींनी कमी आहे.

तीन वर्षात मुंबईतील सर्वच रस्त्यांचे कॉक्रिटीकरण  

चालू आर्थिक वर्षात महापालिकेला 33290 कोटींचा महसूल मिळेल, असा अंदाज बजेटमध्ये व्यक्त करण्यात आला. पुढील तीन वर्षात मुंबईतील सर्वच रस्ते कॉक्रिट केले जातील, असे डॉ. चहल यांनी सांगितले. पादचऱ्यांसाठी स्वतंत्र फूटपाथ तयार करण्याचे धोरण, मुंबईकरांच्या आरोग्यासाठी आरोग्य कुटुंबकम योजना, आपला दवाखान्यांची संख्या वाढवणे आणि कोस्टल रोड, गोरेगाव मुलुंड लिंक रोड यासारख्या प्रकल्पांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.

बजेटमधील विभागनिहाय आर्थिक तरतूद


bmc-budget-2023-24-highlights.jpg

हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी एअर प्युरिफायर टॉवर

मुंबईतील वायू प्रदूषणा रोखण्यासाठी पालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या सर्व सात झोनमध्ये दोन एअर प्युरिफायर टॉवर उभारले जाणार असल्याचे प्रशासक डॉ. चहल यांनी सांगितले. प्रत्येक एअर प्युरिफायर टॉवरसाठी 3.5 कोटींचा खर्च येणार आहे. रिअल इस्टेट क्षेत्रात सुरु असलेल्या प्रकल्पांमुळे हवेची गुणवत्ता खराब झाली असल्याचे त्यांनी सांगितले. रिअर इस्टेटमधील प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर नियमावली लागू करणार असल्याचे चहल यांनी सांगितले. 

बजेटवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची छाप

मुंबई पालिकेतील भ्रष्ट कारभारावरुन मागील सहा महिन्यांपासून शिवसेना आणि भाजप-शिंदे गट यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. मागील 25 वर्ष शिवसेनेची मुंबई पालिकेत सत्ता आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ठ असल्याने पालिकेचा निवडणूक कार्यक्रम लांबणीवर पडला आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पालिकेसाठी हंगामी बजेट सादर करण्याची मागणी केली होती. मात्र प्रशासकांनी 2023-2024 या पूर्ण वर्षाचे बजेट सादर केले. या बजेटवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची छाप दिसून आल्याची चर्चा पालिका वर्तुळात होत आहे. पायाभूत प्रकल्प, मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठीचे उपाय आणि आरोग्य क्षेत्रातील तरतुदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनांनुसार करण्यात आल्याचे प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले.