Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

क्रिप्टोत गुंतवणूक करण्यापूर्वी 'या' जोखमींपासून सावध रहा!

crypto

बिटकॉईनसह सर्वच क्रिप्टोकरन्सीमध्ये अस्थिरता आहे. पण क्रिप्टोमध्ये दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केल्यास तुलनेने अधिक नुकसान होणार नाही. तसेच दीर्घकालीन गुंतवणुकीमुळे परताव्यात चांगली वाढ होऊ शकेल.

गेल्या महिन्याभरात रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धामुळे जागतिक बाजारपेठेतील अनिश्चिततेचं वातावरण आणि गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीमुळे क्रिप्टोकरन्सी बाजारात सुरू असलेली पडझड अजून सुरू आहे. बिटकॉईन, इथेरियम, बीएनबी, टेरा या कॉईनच्या किमतीत घसरण सुरूच आहे. गेल्या महिन्याभरात क्रिप्टोमध्ये झालेल्या घसरणीनेमुळे गुंतवणूकदारांचे बरेच नुकसान झाले.

'कॉइनमार्केटकॅप'नुसार शनिवारी दि. 4 जून रोजी बिटकॉईनच्या किमतीत 24 तासांत 1.82 टक्के घसरण झाली असून, एका बिटकॉईनचा भाव 29,728.70 डॉलर इतका झाला. तर गेल्या 7 दिवसात बिटकॉईनमध्ये 3.01 टक्के वाढ झाली. इथेरियमच्या किमतीत आज 1.27 टक्के घसरण झाली. एक इथेरियमचा भाव 1,775.07 डॉलर इतका असून गेल्या 7 दिवसात त्यात 0.74 टक्के वाढ झाली. आज सोलाना कॉईनच्या किंमतीत देखील घसरण झाली. तर सध्या एका सोलाना कॉईनची किंमत 37.58 डॉलर इतकी खाली आली आहे. गेल्या 7 दिवसात सोलाना कॉईनमध्ये 9.24 टक्क्यांनी घसरण झाली.

बिटकॉईनसह सर्वच क्रिप्टोकरन्सीमध्ये अस्थिरता आहे. पण क्रिप्टोमध्ये दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केल्यास तुलनेने अधिक नुकसान होणार नाही. तसेच दीर्घकालीन गुंतवणुकीमुळे परताव्यात चांगली वाढ होऊ शकेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पण तरीही तुम्ही जर क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर, यातील जोखीम आणि फायदा याबद्दल जाणून घेऊनच गुंतवणूक करण्याचा विचार करा.

क्रिप्टोकरन्सी (Crypto Currency) ही एक विकेंद्रीकृत मालमत्ता (decentralized asset) आहे. सरकारकडून यासंदर्भात अद्याप कोणतेही नियम तयार करण्यात आलेले नाहीत. भारतात सरकारने क्रिप्टोकरन्सी संदर्भात कोणतेही नियमावली प्रसिद्ध केलेली नाही. त्यामुळे यामध्ये केलेल्या गुंतवणुकीला पूर्णपणे गुंतवणूकदार जबाबदार आहे.

या जोखमीपासून सावध राहा

क्रिप्टोकरन्सीमध्ये चोरी, फसवणूक, खाते हॅक करणे आणि गैरव्यवहाराचा ट्रेंड खूप मोठ्या  प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे यात गुंतवणूक करणं हे जोखमीचं तर आहेच. पण यात आर्थिक नुकसान झाल्यास तक्रार करण्याची सुद्धा सोय नाही.

क्रिप्टोकरन्सीमध्ये कोणत्याही प्रकारचे नियम आणि कायदे नाहीत. त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता खूप आहे.

क्रिप्टोकरन्सी ही स्थिर नाही. त्यामुळे यातून मोठ्या प्रमाणात नफा व तोटा होण्याची शक्यता सर्वाधिक आहे.

क्रिप्टो एक्सचेंज 24 तास आणि 7 दिवस काम करतात. स्टॉक मार्केटप्रमाणे आठवड्यातले पाच दिवस आणि ठराविक वेळेत हे काम करत नाही. त्यामुळे याच्या व्यवहारावर सतत नजर ठेवावी लागते. अन्यथा नुकसान होण्याची शक्यता असते.

जगातील मोठमोठ्या गुंतवणूकदारांनी आणि काही नावाजलेल्या उद्योगपतींनी क्रिप्टोकरन्सीचा उल्लेख उद्याचे भविष्य असा केला आहे. तरीही क्रिप्टोमध्ये व्यवहार करताना सावधता बाळगणं आवश्यक आहे.