आजकाल सर्वत्र डिजिटल व्यवहार होत आहेत. पूर्वी पैसे पाठवण्यासाठी पोस्टात किंवा बँकेत जावे लागत होते. पण आता डिजिटल युगात मोबाईलद्वारे काही सेकंदात पैसे पाठवता येतात. सध्याचे तंत्रज्ञान इतके प्रगत आहे की, या नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून सारे जग पैसे कमवत आहे. या नवीन तंत्रज्ञानाचे नाव क्रिप्टोकरन्सी आहे. हे चलन आपण पाहू किंवा स्पर्श करू शकत नाही. म्हणून त्याला आभासी चलन ही म्हणतात.
गेल्या काही वर्षांत क्रिप्टोकरन्सी अधिकाधिक लोकप्रिय होऊ लागल्या आहेत. त्याच्या संख्येतही सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे ब्लॉकचेन विकसकांच्या (Blockchain developer) मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. ब्लॉकचेन हे बिटकॉईन क्रिप्टोकरन्सी बनवण्यासाठी वापरण्यात आलेलं मूलभूत तंत्रज्ञान आहे. ब्लॉकचेन डेव्हलपरच्या पगारावरून याचा अंदाज लावू शकतो की, क्रिप्टोकरन्सीचे किती मूल्य आहे. एका स्टॅक डेव्हलपरचा सरासरी पगार 1,12,000 डॉलरपेक्षा जास्त आहे.
चलनाचा इतिहास
प्राचीन काळात मानवाने आपल्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी वस्तुंच्या देवाण-घेवाणीची पद्धत स्वीकारली होती. पण कालांतराने ही पद्धत परिपूर्ण नसल्याचे लक्षात आल्यावर मानवाने चलनाची निर्मिती केली. इसवीसन पूर्व 110 मध्ये सर्वप्रथम अधिकृत चलन तयार केले गेले. त्यानंतर इसवी सन 1250 मध्ये सोन्याचा मुलामा असलेले चलन युरोपमध्ये आणले गेले. त्यानंतर 1600 ते 1900 पर्यंत संपूर्ण जगभर कागदी चलनं लोकप्रिय झाली. अशाप्रकारे वेगवेगळ्या संक्रमणातून जात आधुनिक चलन अस्तित्वात आले हे आपल्याला माहीतच आहे.
आताच्या आधुनिक चलनामध्ये कागदी नोटा, नाणी, क्रेडिट कार्ड आणि डिजिटल वॉलेट्स उदाहरणार्थ, गुगल पे (Google pay), पेटीएम (PayTM), युपीआय (UPI) यांचा समावेश होतो. या सर्वांवर बँका आणि सरकारच्यावतीने नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या संस्थेद्वारे नियंत्रण ठेवले जाते.
क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? (What is Cryptocurrency?)
क्रिप्टोकरन्सी हे एक आभासी चलन (Virtual currency) आहे. ते स्वतंत्र चलन असून त्याचा कोणीही मालक नाही. हे चलन संगणकाचा वापर करून बनवलेले चलन आहे. 2009 मध्ये सातोशी नाकामोटो यांनी सर्वप्रथम बिटकॉईन तयार केली होते. ह्याचा वापर करून आपण जगातील कोणत्याही व्यक्तीला पैसे पाठवू शकतो.
क्रिप्टोकरन्सी हे एक डिजिटल चलन असून, यासाठी क्रिप्टोग्राफी वापरली जाते. याचा वापर वस्तू किंवा सेवा खरेदी करण्यासाठी केला जाऊ शकतो. याच्या वापरासाठी कोणत्याही बॅंकेत किंवा सरकारी संस्थेत जावे लागत नाही. याचा वापर इंटरनेटच्या मदतीने करावा लागतो.
क्रिप्टोकरन्सीचे काही प्रचलित प्रकार
1. बिटकॉइन (Bitcoin)
बिटकॉइन ही जगामधली पहिली क्रिप्टोकरन्सी मानली जाते. 2009 मध्ये सातोशी नाकामोटो या नावाच्या व्यक्तीने गंमत म्हणून हा कॉईन तयार केला होता. बिटकॉईन ही एक डिजिटल करन्सी आहे. त्याचा उपयोग ऑनलाइन खरेदीसाठी आणि पैसे पाठवण्यासाठी केला जातो. यावर कोणत्याही सरकार किंवा देशाचा हक्क नाही.
2. लिटकॉइन (Litecoin)
बिटकॉईनला पर्याय म्हणून, 2011 मध्ये लिटकॉईन आणण्यात आले. इतर क्रिप्टोकरन्सी प्रमाणेच लिटकॉईन हे एक मुक्त स्त्रोत आहे. चार्ली ली (Charlie Lee) याने लिटकॉइनची निर्मिती केली असून तो गूगल या जगप्रसिद्ध कंपनीत काम करत होता.
3. इथेरियम (Ethereum)
इथेरियम हे ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित तयार करण्यात आलेलं मुक्त स्त्रोत आहे. 2015 मध्ये इथेरियम तयार करण्यात आले. इथेरियमची इथेर (ETH) नावाची मूळ क्रिप्टोकरन्सी आहे. इथेर ही डिजिटल करन्सी आहे. ती जगभरात कुठेही पाठवली जाते. लोक याचा वापर पेमेंटसाठी करतात.
4. रिपल (Ripple)
रिपल हे क्रिप्टोकरन्सी आणि डिजिटल पेमेंट नेटवर्क असं दोन्हीप्रकारे काम करते. 2012 मध्ये रिपल आले होते. याचा वापर सुरक्षित आर्थिक व्यवहारांसाठी केला जात होता. रिपल कोणत्याही प्रकारच्या चलनात एक्सचेंज होते.
5. बिटकॉईन कॅश (Bitcoin Cash)
बिटकॉईन कॅश हा डिजिटल करन्सीचाच एक प्रकार आहे. बिटकॉईन कॅश हे बिटकॉईनची काही विशिष्ट वैशिष्ट्ये सुधारित करण्यासाठी तयार करण्यात आले होते. बिटकॉईन कॅशच्या ब्लॉक्सचा आकार वाढविण्यात आल्यामुळे याची प्रक्रिया अधिक वेगवान होऊ लागली.
6. झेकॅश (Zcash)
झेकॅश हे डिजिटल चलन असून ते बिटकॉईनच्या मूळ कोडबेसवर तयार केले गेले होते. हे चलन एमआयटी जॉन्स हॉपकिन्स आणि इतर प्रसिद्ध शैक्षणिक आणि वैज्ञानिक संस्थांमधील वैज्ञानिकांनी मिळून तयार केले आहे. हे विकेंद्रित ब्लॉकचेनवर तयार केले गेले.
7. मोनेरो (Monero)
मोनेरो क्रिप्टोकरन्सी 2014 मध्ये सुरू करण्यात आली होती. या करन्सीची थोड्याच कालावधीत लोकप्रियता वाढली होती. मोनेरो ही करन्सी रिंग सिग्नेचर या विशेष तंत्राचा वापर करून तयार करण्यात आली. या तंत्रज्ञानामुळे याची गोपनीयता सक्षम असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे ही करन्सी थोड्याच कालावधीत लोकप्रिय झाली.
8. सिया कॉईन (Sia Coin)
सिया कॉईन हे क्रांतिकारी क्रिप्टोकरन्सी मानले जाते. जे शून्य खर्चाचे आणि अविश्वसनीय गतीने आर्थिक व्यवहार देते. सिया कॉईन हे ब्लॉकचेनवर काम करते आणि ते बिटकॉईनचाच एक भाग आहे.
क्रिप्टोकरन्सीचे फायदे
- क्रिप्टोकरन्सी हे एक डिजिटल चलन आहे, ज्यामध्ये फसवणूक होण्याची शक्यता कमी आहे.
- क्रिप्टोकरन्सी मधून तुम्ही जगातील कोणत्याही व्यक्ती ला जलद गतीने पैसे पाठवू शकता.
- क्रिप्टोकरन्सी बनवताना वेगवेगळ्या अल्गॉरिदमचा उपयोग केल्यामुळे त्याचे खाते सुरक्षित राहते.
- तुमच्याकडे जास्त पैसे असतील तर यात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते.
- क्रिप्टोकरन्सी हे गुंतवणुकीसाठी हे एक उत्तम व्यासपीठ आहे.
- यावर कोणत्याही सरकारचे नियंत्रण नाही. याचे व्यवहार 24 तास सातही दिवस सुरू असतात.
क्रिप्टोकरन्सीचे तोटे
- क्रिप्टोकरन्सीमध्ये सध्या चोरी, फसवणूक, खाते हॅक करणे आणि गैरव्यवहाराचा ट्रेंड खूप प्रमाणात सुरू आहे.
- क्रिप्टोकरन्सीमध्ये कोणत्याही प्रकारचे नियम आणि कायदे नाहीत. त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता खूप आहे.
- क्रिप्टोकरन्सी ही स्थिर नाही. त्यामुळे यातून मोठ्या प्रमाणात नफा व तोटा होण्याची शक्यता आहे.
क्रिप्टोकरन्सीच्या वापराबाबत अनेक देशांमध्ये संभ्रम आहे. तर काही देशांनी याच्यासाठी स्वत:चे नियम तयार केले आहेत. भारत सरकारही यावर विचार करत असून क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून होण्यावर नफ्यावर 30 टक्के कर आकारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यावर सरकार लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे.