जगाचे लक्ष लागून राहिलेल्या फिफा वर्ल्ड कप 2022 ची सुरुवात होण्याआधीच कतारने फुटबॉल फॅन्सला झटका दिला आहे. कतारने धोरणात बदल करुन ज्या ठिकाणी फुटबॉल मॅचेस होणार आहेत अशा सर्वच 8 स्टेडियममध्ये बियर आणि अल्कोहोलची विक्री करण्यावर बंदी घातली आहे. फिफा संघटना आणि कतार सरकार आणि AB InBev कंपनीचे प्रतिनिधी यांच्यात झालेल्या या बैठकीनंतर स्टेडियममध्ये बियर विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.
फिफा वर्ल्ड कपच्या निमित्ताने जगभरातील किमान 15 लाख फुटबॉलप्रेमी कतारला भेट देणार आहेत.मात्र कतारने ऐनवेळी मद्य विक्रीबाबत धोरण बदलल्याने या स्पर्धेची प्रायोजक असलेल्या AB InBev या कंपनीला देखील फटका बसण्याची शक्यता आहे.AB InBev कंपनीकडून बडवायजर या प्रसिद्ध बियर ब्रॅंडची विक्री केली जाते.
कतार हा कट्टर मुस्लिमधर्मीय देश आहे. आयोजकांच्या मते FIFA World Cup 2022 साठी आशिया आणि मिडल ईस्टमधील देशांमधून येणाऱ्या फुटबॉलप्रेमींची संख्या प्रचंड असण्याची शक्यता आहे. या देशांमध्ये अल्कोहोलबाबत धोरण कडक असल्याने स्टेडियमध्ये बिअर बंदीचा फारसा परिणाम जाणवणार नाही, असा दावा आयोजकांनी केला आहे.
स्टेडियममध्ये बियर आणि अल्कोहोल विक्रीवर बंदी घालण्यात आली असली तरी हॉटेल्स, फॅन्स व्हिलेज आणि परवाने असलेल्या ठिकाणांवर मद्य विक्री सुरु राहणार आहे. त्याशिवाय एअरपोर्टवर ड्युटी फ्रीमध्ये बिअर आणि मद्य खरेदी करता येईल. अर्धा लीटर बियरचा दर 15 डॉलरच्या दरम्यान आहे.
AB InBev ने फिफा वर्ल्ड कपसाठी दिलीय 75 मिलियन डॉलर्सची स्पॉन्सरशीप
कतारमध्ये होणाऱ्या फिफा वर्ल्ड कप 2022 साठी AB InBev ने तब्बल 75 मिलियन डॉलर्स (भारतीय चलनात 615 कोटी) स्पॉन्सपशीप दिली आहे. फिफाच्या या मेगा इव्हेंटमधील प्रमुख स्पॉन्सर्डपैकी AB InBev ही एक कंपनी आहे. कंपनीने या खास इव्हेंटसाठी तयारी देखील जोरदार केली आहे. FIFA World Cup 2022 च्या थीमवर बिअर बॉटल्स प्रिंट केल्या असून त्यासोबत कतारमध्ये जोरदार कॅम्पेन केले आहे.
या संपूर्ण सर्धेत बडवायरच्या विक्रीसाठी खास व्यवस्था करण्यात आली होती. त्यानुसार वर्ल्ड कप मॅच सुरु होण्यापूर्वी स्टेडियममध्येजवळ तीन तास आधी आणि मॅच संपल्यावर एक तास अशा विशेष वेळेत बडवायजरची विक्री करण्याची परवानगी देण्यात आली होती, मात्र आता ऐनवेळी धोरणात बदल करुन स्टेडियममध्ये आणि आसपास बियर विक्रीवर सरसकट बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.