Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

BoI Shubh Arambh FD : ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी, बँक ऑफ इंडियाच्या शुभ आरंभ एफडी व्याजदरात बदल

BoI Shubh Arambh FD : ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी, बँक ऑफ इंडियाच्या शुभ आरंभ एफडी व्याजदरात बदल

BoI Shubh Arambh FD : बँक ऑफ इंडियानं (BoI) ज्येष्ठ नागरिकांसाठी शुभ आरंभ मुदत ठेव योजनेत काही बदल केले आहेत. याअंतर्गत मुदत ठेव व्याज दर नुकतेच सुधारित करण्यात आले आहेत. 7 दिवस ते 10 वर्ष या कालावधीसाठी व्याजदर दिला जातो.

बँक ऑफ इंडिया (Bank of India) आपल्या शुभ आरंभ मुदत ठेव योजनेच्या (Shubh Arambh FD) माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी एक भरवशाची आणि चांगला परतावा देणारी योजना देत आहे. 1 एप्रिल 2023पासून बँक ऑफ इंडिया सुपर सिनिअर सिटीझन्ससाठी (Senior citizens) 501 दिवसांच्या मुदत ठेवींसाठी 7.80 टक्के उच्च असा व्याज दर ऑफर करत आहे. या योजनेचा उद्देश सुरक्षित गुंतवणुकीचा (Investment) पर्याय प्रदान करणं आहे. 60 ते 80 वयोगटातल्या इतर ज्येष्ठ नागरिकांना 7.65 टक्के दर उपलब्ध आहे.

आकर्षक व्याजदर

बँक ऑफ इंडिया 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या इतर कालावधीसाठीदेखील आकर्षक असे व्याजदर देत आहे. 7 दिवस ते 10 वर्षे मुदतीच्या ठेवींवर सुपर ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.40 टक्के आणि नियमित ग्राहकांसाठी 6.75 टक्क्यांपर्यंत व्याजदर मिळणार आहे. हे सुधारित व्याजदर देशांतर्गत, एनआरओ (NRO) आणि एनआरई (NRE) ठेवींवर लागू होणार आहेत. तीन वर्षे आणि त्याहून जास्त कालावधीच्या ठेवींसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.75 टक्के आणि अति ज्येष्ठ नागरिकांसाठी सामान्य व्याजदरापेक्षा 0.90 टक्के असा एकूण अतिरिक्त व्याजाचा दर आहे.

ज्येष्ठ आणि अति ज्येष्ठांना फायदा

भारतातल्या वृद्ध लोकांची अधिक चांगली काळजी घेतली जावी त्याचप्रमाणे त्यांच्याकडे लक्ष दिलं जावं यासाठी बँक प्रयत्न करत आहे. विशेषत: आर्थिक बाबींचा ज्यावेळी विचार केला जातो. हेच लक्षात घेऊन बँक ऑफ इंडियानं आपल्या शुभ आरंभ ठेव योजनेंतर्गत 80 आणि त्याहून अधिक वयाच्या अति ज्येष्ठ नागरिकांसह ज्येष्ठांसाठी विशेष मुदत ठेव योजना तयार केली आहे. ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.50 टक्के आणि अति-ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.65 टक्के अतिरिक्त व्याजदरासह त्यांना आर्थिक लाभ देण्याचा प्रयत्न करते. याची सविस्तर माहिती निवेदनाद्वारे बँकेनं दिली.

ठेवीदारांना देतात अधिक लवचिकता

बँक ऑफ इंडियाच्या एफडी योजना ठेवीदारांना अधिक लवचिकता देतात. जास्त कालावधीसाठी नूतनीकरणावर अतिरिक्त शुल्क किंवा दंड आकारला जात नाही. तर बचतीचं व्यवस्थापन करण्यास सहाय्य करतात. याव्यतिरिक्त ग्राहक मुदत ठेवीच्या थकबाकीच्या 90 टक्क्यांपर्यंत त्यांच्या ठेवींवर कर्ज घेऊ शकतात. 60 वर्षांपेक्षा कमी वयाचे लोक 7.15 टक्क्यांपर्यंत व्याज मिळवू शकतात, असं बँकेनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

विविध बँकांच्या एफडी

रिझर्व्ह बँकेनं अलिकडेच आपल्या रेपो दरात वाढ केली. त्यानंतर विविध बँकांनी आपल्या मुदत ठेवींवरच्या म्हणजेच एफडीच्या व्याजदरात वाढ केलीय. आर्थिक वर्षाला सुरुवात झालीय. अनेकजण गुंतवणुकीचे सुरक्षित पर्याय शोधत आहेत. विविध सरकारी तसंच खासगी बँका गुंतवणुकीच्या विविध योजना आणतात. आपला वयोगट आणि जबाबदाऱ्यांच्या आधारावर या गुंतवणूक पर्यायांची निवड केली जाते. सध्या एसबीआय एफडी, पंजाब अँड सिंध बँक एफडी, इंडियन बँक एफडी या सरकारी तर एचडीएफसी, आयडीबीआय अशा विविध बँकांनी आपल्या ग्राहकांसाठी मुदत ठेव योजना आणल्या आहेत. यात सर्वच बँकांनी आपला व्याजदर 7 टक्क्यांपेक्षा अधिक ठेवलाय. तर बँक ऑफ इंडियाच्या वरील योजनेतदेखील तो 7 टक्क्यांच्या वर आहे.