Loan Demand Increased: वैयक्तिक तसेच व्यावसायिक अशा सर्व प्रकारच्या कर्ज वितरणाचे प्रमाण वाढल्याचे RBI च्या आकडेवारीतून समोर आले आहे. गृह, वाहन, वैयक्तिक अशा किरकोळ कर्जांसोबत व्यावसायिक कर्जांचे प्रमाण मागील वर्षापेक्षा वाढले आहे. जून 2022 शी तुलना करता चालू वर्षी जून मध्ये 16.3 टक्क्यांनी विविध कर्जांचे वितरण वाढले आहे.
रिटेल आणि व्यावसायिक कर्जाला डिमांड
महागाई, जागतिक अस्थिरता, व्याजदर चढे असतानाही भारतीय ग्राहकांची कर्जाची मागणी सकारात्मक आहे. गृह आणि वाहन कर्ज या यादीत टॉपवर आहे. दरम्यान, पर्यटन आणि महाविद्यालयीन शिक्षणासाठीच्या कर्जाची मागणीही वाढली आहे. यापूर्वी या दोन कॅटगरीमध्ये कर्जाची डिमांड जास्त नव्हती.
वैयक्तिक कर्जातही वाढ
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या जून बुलेटिनमधून ही आकडेवारी समोर आली आहे. एकूण बँकांच्या कर्ज वितरणापैकी वैयक्तिक कर्जाचे प्रमाण 28% इतके आहे. 2017-18 मध्ये हे प्रमाण 21% होते. मोठ्या उद्योगांचे कर्ज घेण्याचे प्रमाण मागील वर्षी 3.2% होते. ते वाढून चालू वर्षी जून महिन्यात 6.4 टक्के झाले आहे.
भांडवली खर्चात वाढ
कंपन्यांचा भांडवली खर्च वाढत असल्याचे यातून दिसून येत आहे. तसेच येत्या काळात भांडवली खर्चात आणखी वाढ होण्याची शक्यता QuantEco रिसर्च या संस्थेने वर्तवली आहे. म्हणजे उद्योगांकडून कर्जाची मागणी आणखी वाढेल. दरम्यान, अल्प आणि मध्यम स्वरुपाच्या उद्योगांची कर्जाची मागणी रोडावली आहे. मागील वर्षी MSME कडून कर्जाची मागणी 47.8 % होती. ती चालू वर्षी 29.2 टक्क्यांवर आली आहे.