Aegon Life Insurance: एगॉन लाइफ इन्शुरन्स ही कंपनी बंधन फायनान्शिअल होल्डिंग कंपनीने (BFHL) सर्व समभाग खरेदी करून विकत घेतली आहे. मायक्रोफायनान्स बँक म्हणून स्थापन झालेल्या बंधन बँकेचा व्यवसाय मागील काही वर्षात वेगाने वाढला आहे. बँकिंग, म्युच्युअल फंड, इक्विटी क्षेत्रात कंपनीने पाय रोवला आहे. एगॉन लाइफ इन्शुरन्स कंपनी खरेदीचा व्यवहार साडेचारशे कोटींना झाल्याची माहिती समोर येत आहे.
एगॉनमधील 3 लाख ग्राहक बंधन बँकेकडे
एगॉन ही डिजिटल इन्शुरन्स कंपनी म्हणून मागील काही वर्षात नावारूपाला आली आहे. कंपनीकडे 3 लाखांपेक्षा जास्त विमा ग्राहक आहेत. ही कंपनी ताब्यात घेण्यासाठी इतरही कंपन्या उत्सुक होत्या. (Bandhan Bank acquires Aegon Insurance) मात्र, बंधन फायनान्शिअल होल्डिंगने या व्यवहारात बाजी मारली. एगॉन लाइफ इन्शुरन्स कंपनी विकत घेतल्यामुळे बंधन फायनान्शिअल होल्डिंग कंपनीला आपल्या सेवांचा अधिक विस्तार करता येईल, असे BFHL चे व्यवस्थापकीय संचालक करनी अराह यांनी म्हटले.
विमा क्षेत्रात बंधन फायनान्शिअलची उडी
एगॉन लाइफ इन्शुरन्स कंपनीमध्ये एगॉन इंडिया होल्डिंगचे 49% आणि बेनेट, कोलमन & कंपनी लिमिटेड (BCCL) चे 46.09% शेअर्स होते. हे सर्व शेअर्स बंधन फायनान्शिअल होल्डिंग कंपनीने विकत घेतले आहेत. हा व्यवहार पूर्ण झाला असला तरी नियामक संस्थेची मान्यता मिळाल्यानंतर अधिकृतरित्या मान्यता मिळेल. बँकिंग आणि म्युच्युअल फंड व्यवसायासोबत आता विमा क्षेत्रात उतरण्याची संधी बंधन कंपनीला मिळाली आहे.
साडेचारशे कोटींचा व्यवहार?
या व्यवहारासाठी जेफरिज या कंपनीने Aegon and BCCL साठी आर्थिक सल्लागार म्हणून काम पाहिले. तर कायदेशीर सल्लागार म्हणून AZB & Partners आणि Khaitan & Co दोन कंपन्यांनी काम पाहिले. या व्यवहाराची एकूण किंमत 430-450 कोटी रुपये असावी, असा अंदाज सीएनबीसी टीव्ही 18 ने वर्तवला आहे. दरम्यान, निश्चित किंमत पुढे आली नाही.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            