Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना या चुका टाळा, फायद्यात राहाल

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना या चुका टाळा, फायद्यात राहाल

जाणून घ्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीत होणाऱ्या काही साध्या सोप्या चुका

गुंतवणूकदारांसाठी आजकाल म्युच्युअल फंड गुंतवणूकीसाठी सर्वात लोकप्रिय माध्यम बनले आहे... मात्र ही गुंतवणूक करताना बऱ्याच वेळा काही चुका केल्या जातात ज्या टाळल्या पाहिजेत.                 

1. नव्यानेच गुंतवणूक करणारे अनेक जण अल्पकालीन पण उच्च परताव्यामुळे इतके आकर्षित होतात की ते म्युच्युअल फंडमध्येही स्टॉक गुंतवणूकीबद्दलची त्यांची धारणा राखतात. स्टॉकचे मूल्यांकन कमी किंवा जास्त होऊ शकते. मात्र म्युच्युअल फंडबाबत तोच नियम लागू होत नाही. त्यामुळे केवळ व्यापाराच्या दृष्टीने म्युच्युअल फंडची खरेदी किंवा विक्री करणे ही गुंतवणुकीतील चूक ठरू शकते. म्युच्युअल फंड कधीही शेअर इतका परतावा देऊ शकत नाहीत आणि संभाव्य तोटाही तितकासा तीव्र नसतो.                 

2. बहुदा गुंतवणूकदार न्यू फंड ऑफर (NFO)मध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. कारण त्यांच्या मते NFOच्या प्रती युनिटची किंमत स्वस्त असते. मात्र त्या स्वस्त किमतीवर लक्ष न देता भविष्यात गुंतवणूकीतुन किती फायदा होईल याचाही विचार करणे महत्वाचे आहे.                 

3. म्युच्युअल फंडमध्ये निश्चित परताव्याची हमी नसते. 'म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बाजारपेठेतील जोखमींच्या अधीन आहे', अशी सूचना म्युच्युअल फंडच्या प्रत्येक जाहिरातीत दिलेली असते. याचाच अर्थ बाजारातील परिस्थितीनुसार म्युच्युअल फंडमधून मिळणाऱ्या परताव्यात चढउतार होऊ शकतो. तसेच जोखीम मुक्त समजल्या जाणाऱ्या डेट फंडांमध्येही नियमित हमी परतावा मिळू शकत नाही.                 

4. भूतकाळात गुंतू नका. म्युच्युअल फंडची मागील कामगिरी किती चांगली होती, तेव्हा किती नफा मिळाला होता यावर भाळून जाऊ नका. भविष्यातही तीच (नफ्याची) पुनरावृत्ती होईल याची शाश्वती नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांनी केवळ मागील कामगिरीवर अवलंबून न राहता फंडाच्या प्रत्येक पैलूची छाननी केली पाहिजे.  

5. म्युच्युअल फंडच्या कामगिरीची तुलना हमखास केली जाते. त्यातून परतावा किती मिळाला याकडेच गुंतवणूकदारांचे लक्ष असते. मात्र ते एकाच श्रेणीतील आहे की नाही हे कोणी बघत नाही. हे योग्य नाही. फंडाच्या प्रत्येक पैलूचा अभ्यास करूनच त्यात गुंतवणूक करावी की नाही याचा निर्णय घ्यावा. स्मॉल कॅप फंडाच्या कामगिरीची तुलना तुम्ही लार्ज कॅप फंडाशी करू शकत नाही.                 

6. बाजारातील चढउतारांना घाबरून, पॅनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका. जे गुंतवणूकदार संयम बाळगतात, त्यांना त्याचे योग्य फळ नक्कीच मिळते. दीर्घकालीन ध्येय ठेवले असेल तर गुंतवणुकीशी छेडछाड करण्याची गरज नाही, कारण बाजारपेठेत चढउतार होतच असतात.                 

7. आर्थिक सल्लागाराची मदत घेणे अनावश्यक आहे, असे अनेक गुंतवणूकदारांना वाटते. मित्रमंडळी, सहकारी यांचा सल्ला घेऊन किंवा सोशल मीडियातून मिळालेल्या टिप्सवरून अनेक जण गुंतवणूक करतात. मात्र गुंतवणूक ही एक आजीवन प्रक्रिया असून ती जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर बदलत असते. आर्थिक सल्लागार गुंतवणूकदारांना त्यांच्या गरजेनुसार योग्य मार्गदर्शन करतो. त्यामुळे त्यांची मदत घेणे फायदेशीरच ठरते.                 

8. कोणत्याही ध्येयाशिवाय गुंतवणूक करणे, म्हणजे स्टिअरिंग व्हील नसलेल्या कारसारखे आहे. दुर्दैवाने बहुतेक लोक योग्य नियोजनाशिवाय गुंतवणूक करतात. एखादे उद्दिष्ट, ध्येय समोर ठेवून केलेली गुंतवणूक, गुंतवणूकदारांना त्यांच्या पोर्टफोलिओसाठी आवश्यक असलेल्या योग्य मालमत्ता वाटपाचा निर्णय घेण्यास मदत करते.                 

थोडक्यात, आपण आपले पैसे ज्या उत्पादनांमध्ये गुंतवत आहोत, त्याबद्दल संपूर्ण माहिती असणे महत्वाचे आहे. गुंतवणूकीबद्दल पुरेसे ज्ञान नसेल तर या प्रवासात अनेक चुका होतात शकतात, ते टाळा. तसेच इतरांनी केलेल्या चुकांवरून योग्य धडा घ्या आणि शिका.