Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

म्युच्युअल फंड कसा निवडावा; समजून घ्या निकष

म्युच्युअल फंड कसा निवडावा; समजून घ्या निकष

सध्या बाजारात अनेक प्रकारचे फंड उपलब्ध आहेत. त्यातून चांगला म्युच्युअल फंड निवडताना कोणत्या गोष्टी पाहायच्या आणि योग्य फंडाची निवड कशी करायची हे पाहणार आहोत.

आजकाल सर्रासपणे गुंतवणूक करण्यासाठी चांगला रिटर्न देणारा आणि इतरांच्या तुलनेत कमी जोखीम असलेला पर्याय म्हणजे म्युच्युअल फंडकडे पाहिले जाते. म्युच्युअल फंडमध्ये बॅंकेतील व्याजापेक्षा जास्त परतावा मिळतो. तसेच कमीतकमी पैशांपासून गुंतवणुकीस सुरूवात करता येते. सर्व प्रकारच्या गुंतवणूक गरजांसाठी म्युच्युअल फंड हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. आताच्या उत्पन्नाच्या आधारे भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी बरेच गुंतवणूकदार म्युच्युअल फंडाची निवड करतात. सध्या बाजारात अनेक कंपन्यांच्या फंडांचे पर्याय उपलब्ध आहेत. या सर्व फंडांमधून आपल्या गरजेनुसार योग्य फंड कसा निवडायचा हे आपण पाहणार आहोत.

कोणताही गुंतवणूकदार किंवा सर्वसामान्य व्यक्ती आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी गुंतवणूक करत असतो. कोणाला चारचाकी गाडी घ्यायची असते, कोणाला मुलांच्या भविष्यातील शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी निधी जमवायचा असतो. तर कोणी निवृत्त झाल्यानंतर करावी लागणाऱ्या खर्चाची तरतदू म्हणून वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करत असतो. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक उद्दीष्टांसाठी म्युच्युअल फंड हा चांगला पर्याय मानला जातो. 

असा निवडावा म्युच्युअल फंड

म्युच्युअल फंडाची प्रामुख्याने खालीलप्रमाणे 3 प्रकाराच्या कालावधीनुसार विभागणी केली जाते. 

  • कमी मुदतीची उद्दिष्ट्ये (Short term Goals) –  कालावधी 1 ते 3 वर्षे
  • मध्यम मुदतीची उद्दिष्ट्ये (Medium term Goals) – कालावधी 4 ते 6 वर्षे
  • दीर्घ मुदतीची उद्दिष्ट्ये (Long term Goals) – कालावधी 7 वर्षांपेक्षा अधिक

 

यातील कालावधीनुसार गुंतवणूकदाराने आपली गरज आणि प्राधान्यक्रम ओळखून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे अपेक्षित आहे. म्हणजे तुम्ही जास्त जोखीम घेण्यास इच्छुक असाल आणि तुमच्याकडे 5 ते 10 वर्षांचा कालावधी असेल तर इक्विटी फंड (Equity fund) निवडावेत. जर तुम्ही मध्यम प्रकारची रिस्क घेऊ शकत असाल तर हायब्रिड फंडा (Hybrid fund)मध्ये गुंतवणूक करू शकता आणि तुम्हाला जर अत्यंत कमी रिस्क घ्यायची असेल तर तुम्ही डेट फंडा (debt fund ) मध्ये गुंतवणूक करू शकता.

तुम्हाला कोणत्या प्रकारच्या फंडामध्ये गुंतवणूक करायची आहे. हे नक्की झाले की, फंड निवडताना त्याची वेगवेगळ्या टप्प्यातील कामगिरी तपासली पाहिजे. फंडाची कामगिरी कशी तपासायची हे आपण समजून घेणार आहोत.

म्युच्युअल फंड रॅंकिंग

म्युच्युअल फंडच्या रॅंकिंगवरून चांगले फंड निवडण्यास मदत होते. क्रिसिल (CRISIL), आयसीआरए (ICRA), मॉर्निंगस्टार (Morningstar), व्हॅल्युरिसर्च (Value Research) अशा संस्था म्युच्युअल फंडच्या योजनांचा अभ्यास करून त्यांचे मूल्यांकन करतात. या मुल्यांकनाच्या आधारे म्युच्युअल फंडची निवड करणे सोपे जाते.

खर्चाचे प्रमाण (Expense ratio)

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी खर्चाचे प्रमाण तपासणे गरजेचे आहे. एखाद्या फंडावरील खर्चाचे प्रमाण अधिक असेल तर त्याचा परिणाम मिळणाऱ्या परताव्यावर होऊ शकतो. फक्त खर्चाचे प्रमाण पाहून फंड निवडणे हे ही तितकेसे योग्य नाही. खर्चासोबतच रेटिंग, रिटर्न्स हे घटकही विचारात घेणे आवश्यक आहे.

एक्झिट लोड (Exit load)

एक्झिट लोड हे वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणुकीच्या स्वरूपावर अवलंबून असतात. तुम्ही जर मुदत पूर्ण होण्यापूर्वीच त्यातून बाहेर पडण्याचा विचार करत असाल तर त्यावर अधिक एक्झिट लोड म्हणून जादा शुल्क आकारले जाऊ शकते. त्याचा परिणाम गुंतवणुकीच्या परताव्यावर होऊ शकतो. त्यामुळे एक्झिट लोड लक्षात घेऊन नियोजन करणे योग्य ठरेल.

फंडचा कालावधी (Fund tenure)

कोणत्याही फंडाच्या कामगिरीचे मुल्यांकन करण्यासाठी कमीत कमी 3 वर्षांचा ट्रॅक रेकॉर्ड असलेल्या फंडमध्ये गुंतवणूक करणे चांगले असते. फंडाच्या ट्रॅक रेकॉर्डवरून त्याच्या कामगिरीचे मुल्यांकन करणे सोपे होते.

मागील परतावा (Previous return)

कोणत्याही फंडमध्ये गुंतवणूक करताना फंडाच्या सध्या कामगिरीवर गुंतवणूक करू नये. त्या फंडाने मागील काही वर्षांमध्ये कशाप्रकारे परतावा दिला आहे. याचा आढावा घेऊनच चांगला परतावा देणाऱ्या फंडाची निवड करणे संयुक्तिक ठरेल.

योग्य फंड हाऊस निवडणे

चांगला म्युच्युअल फंड निवडण्याची प्रक्रिया सुरू करताना चांगला फंड हाऊस निवडणे हे ही तितकेचे महत्त्वाचे आहे. चांगला ट्रॅक रेकॉर्ड असलेली, विश्वसनीय मालमत्ता व्यवस्थापन असलेला फंड हाऊस निवडणे फायद्याचे ठरू शकते. फंड हाऊसचा कालावधी, त्यांची एकूण मालमत्ता यावर त्या फंडचा परफॉर्मन्स अवलंबून असतो.