आलिशान कार निर्मिती करणाऱ्या ऑडी (Audi Car) कंपनीने नववर्षात आपल्या गाड्यांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. विविध श्रेणीतील गाड्यांच्या किंमती 1.7% वाढवण्याचा निर्णय 1 जानेवारी 2023 पासून लागू होणार आहे. उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे कंपनीने म्हटले आहे. तुम्ही जर ऑडी कार घेण्याचा विचार करत असाल तर 1 जानेवारीपासून तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतील.
उत्पादन खर्चात वाढ (Increased Production Cost)
कंपनीच्या व्यवसाय धोरणाचे उद्दिष्ट हे नफा आणि टिकाऊ कार्सच्या मॉडेलवर केंद्रित आहे. उत्पादन खर्च तसेच पुरवठा साखळीच्या खर्चात झालेली वाढीमुळे किंमत वाढवण्याचा निर्णय घेतल्याचे ऑडी इंडियाचे प्रमुख बलबिर सिंग धिल्लाँन यांनी सांगितले. ऑडी ब्रँडची कार उद्योगातील स्थान तसेच कंपनी आणि डिलर्स, पार्टनर्स या सर्वांचा विचार करुन किंमत वाढीचा निर्णय घेण्यात आल्याचेही धिल्लाँन यांनी सांगितले.
भारतातील कार विक्रीचा वाढता आलेख (Audi Sales rising)
मागील काही वर्षात ऑडीचा भारतातील कार विक्रीचा आलेख वाढत आहे. 2020 साली कंपनीने भारतात सुमारे 1,700 कारची विक्री केली होती. 2021 साली कंपनीने 3 हजारांपेक्षा जास्त कार भारतात विकल्या. कोरोनामुळे संपूर्णच वाहन क्षेत्राला फटका बसला होता. मात्र, आता परिस्थिती सुधारत आहे. लक्झ्युरियस कार निर्मिती करणाऱ्या मर्सडिज बेंझ आणि बीएमडब्ल्यू या ऑडीच्या प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत.
ही आहेत ऑडीची मॉडेल्स
ऑडीची पेट्रोल श्रेणीतील A4, A6, A8 L, Q3, Q5, Q7, Q8, S5 Sportback, RS 5 Sportback, and RSQ8 कार बाजारात उपलब्ध आहेत. इलेक्ट्रिक कारही ऑडी कंपनी तयार करत असून e-Tron ब्रँड अंतर्गत e-Tron 50, e-Tron 55, e-Tron Sportback 55, e-Tron GT and RS e-Tron GT या कार बाजारात उपलब्ध आहेत.समजा ऑडी A4 गाडीची एक्स शोरुम किंमत 1.5% वाढली तर तुम्हाला 64 हजार रुपये जास्त मोजावे लागतील. टॉप मॉडेलसाठी ही रक्कम लाखांमध्ये जाईल.
ऑडी कारच्या सर्वात खालच्या मॉडेलची भारतातील किंमत 43 लाखांच्या पुढे सुरू होत असून काही टॉप मॉडेल्सची किंमत २ कोटींच्या घरात आहे. ऑडी A4 ची मुंबईतील एक्स शोरुम किंमत 43 लाखांच्या पुढे सुरू होऊन 51 लाखांपर्यंत जाते. तर ऑडी Q7 ची किंमत 80 लाखांच्या घरात जाते. प्रत्येक शहरानुसार गाडीची किंमत आणि कर आकारणीमध्ये फरक होऊ शकतो.
- ऑडी A4 एक्स शोरुम किंमत - 43 लाख 12 हजार रुपये.
- आरटीओ कर - सुमारे 5 लाख 60 हजार
- विमा - सुमारे 1 लाख 95 हजार
- इतर खर्च - 43 हजार
- ऑडी A4 - ऑन रोड प्राईस 51 लाख
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            