शेतकऱ्यांसाठी सरकारकडून अनेक योजना राबविल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे पीक विमा योजना. आता शेतकऱ्यांना 1 रुपयांत पीक विमा मिळत आहे. या योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यांनी घ्यावा यासाठी पुणे जिल्ह्यात शेतकऱ्यांना बक्षीस जाहीर केले आहे. यासाठी सिंगापूर या गावामध्ये 1 रुपयात पीकविमा योजनेचे अर्ज भरण्यासाठी मेळावा घेण्यात आला होता. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया.
सिंगापूर गावातील मेळाव्यामध्ये लकी शेतकऱ्याला कुट्टी मशिन, फवारणी पंप व इतर काही शेतीविषयक साधने बक्षिस म्हणून देण्यात येणार आहे. या मेळाव्याला अनेक शेतकरी उपस्थित होते. या मेळाव्याचे आयोजक विठ्ठल जगताप आहेत.
कुट्टी मशिन बक्षीस
शेतकऱ्यांच्या पिकाचे झालेले नुकसान पीक विम्यामुळे भरून निघू शकते. पण शासनाकडून फक्त 1 रुपयांमध्ये पीक विमा मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. शेतकऱ्यांमध्ये पीक विम्याबाबत जनजागृती करण्यासाठी जगताप यांनी उच्च किमतीच्या मशीन शेतकऱ्यांना बक्षीस म्हणून देण्याचे ठरविले.
त्यामध्ये 30 हजार रुपये किमतीची कुट्टी मशिन, फवारणी पंप व इतर शेतीउपयोगी साधने यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला गैरसमज दूर करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्याबरोबरच त्यांना पीक विमाबाबत शाश्वती देणे देखील गरजेचे होते.
पीक विमा योजनेत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
पीक विमा अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 31 जुलै होती. आता पर्यंत 1.5 कोटी शेतकऱ्यांनी अर्ज भरले आहेत. परंतु, अनेक शेतकऱ्यांचे पीक विमा अर्ज करायचे बाकी राहिले आहेत. कोणत्याही प्रॉब्लेममुळे शेतकरी या योजनेपासून वंचित राहू नये म्हणून शासनाने पीक विमा अर्ज करण्याची तारीख वाढवून दिली. 3 ऑगस्टपर्यंत शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.