Apple Credit Card: अमेरिकन टेक आणि गॅझेट निर्मिती करणाऱ्या अॅपल कंपनीने भारतामध्ये व्यावसायिक विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये स्वत:च्या मालकीचे स्टोअर सुरू करून यास सुरुवात झाली आहे. आता अॅपल कंपनी HDFC बँकेच्या सहकार्याने क्रेडिट कार्ड आणण्याच्या तयारीत आहे. यासंबंधीची चर्चा सध्या सुरू आहे. नव्या क्रेडिट कार्डचे नाव "अॅपल कार्ड' असेल, अशी माहिती समोर येत आहे.
एचडीएफसी सीईओ आणि टीम कूक यांची भेट
HDFC Bank आणि भारतीय नियामक संस्थांशी अॅपलची बोलणी सुरू असून येत्या काळात ग्राहकांना अॅपल कार्ड दिसू शकेल. यासंबंधीचे वृत्त मनी कंट्रोल या वृत्तसंस्थेने दिले आहे. यावर्षी एप्रिल महिन्यात अॅपल स्टोअरच्या उद्गाटनासाठी अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कुक भारतात आले होते. यावेळी त्यांनी एचडीएफसी बँकेचे सीईओ शशीधर जगदीशन यांची भेट घेतली होती, अशी माहिती समोर येत आहे.
‘अॅपल पे’ सुरू होणार का?
नॅशनल पेमंट कॉर्पोरेशन सोबतही अॅपल कंपनीची बोलणी सुरू आहे. भारतात अॅपल पे लाँच करण्याचा विचार अमेरिकन टेक जायंट करत आहे. अॅपल क्रेडिट कार्ड रुपे वर आधारित असेल की UPI सिस्टिमवर आधारित असेल हे अद्याप स्पष्ट नाही. भारतामध्ये फक्त बँकांनाच क्रेडिट कार्ड देता येते. त्यामुळे याबाबतची माहिती येत्या काळात पुढे येईल. गुगल, अॅमेझॉन, सँमसंग कंपन्या ऑनलाइन पेमेंट क्षेत्रात मोठी गुंतवणूक करत आहे. अॅपलचे पाऊलही त्यात दिशेने पडत असल्याचे दिसून येत आहे.
को-बँडेड क्रेडिट कार्ड
अॅपल कंपनीने भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासोबतही क्रेडिट कार्ड संदर्भात बोलणी केली असल्याचे बोलले जात आहे. (Apple Credit Card) मात्र, को-बँडेड क्रेडिट कार्डसाठीचे जे नियम आहेत त्यानुसार अॅपलला क्रेडिट कार्ड बाजारात आणता येईल, असे RBI ने म्हटल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली. दरम्यान, RBI ने अॅपल कंपनीला याबाबत कोणतीही अतिरिक्त सुविधा देऊ केली नाही, असेही समजते.
को-ब्रँडेड कार्ड म्हणजे काय?
को-ब्रँडेड कार्ड म्हणजे एखादा मर्चंट बँकेच्या सहकार्याने क्रेडिट कार्ड बाजारात आणतो. या कार्डवर शॉपिंग करताना अतिरिक्त सुविधा दिल्या जातात. रिवॉर्ड, डिस्काउंट, गिफ्ट, शुल्कात सूट या कार्डवर इतर कार्डपेक्षा जास्त मिळू शकते. फ्लिपकार्ड, अॅमेझॉन, मेक माय ट्रिप, विमान कंपन्यांनी अशी अनेक को-बँडेड कार्ड बाजारात आणली आहेत. अॅपलचे असे कार्ड आल्यास अॅपलची उत्पादने खरेदी करताना अतिरिक्त सूट मिळू शकते.