अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असलेला बहुचर्चित ‘अॅनिमल’ चित्रपट रिलीज झाला आहे. मागील काही दिवसांपासून हा चित्रपट विशेष चर्चेत आहे. चित्रपटाच्या ट्रेलर व गाण्याला देखील जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.
संदीप रेड्डी वांगा यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘अॅनिमल’ चित्रपट तब्बल 3 तास 21 मिनिटांचा आहे. 100 कोटी रुपये बजेट असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई करण्याची शक्यता आहे. चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. हा चित्रपट 500 कोटींचा टप्पा देखील काढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रणबीर कपूरसह या चित्रपट मोठी स्टार कास्ट झळकणार आहे. मात्र, या चित्रपटासाठी कलाकारांनी किती मानधन घेतले माहितीये का? या चित्रपटासाठी कलाकारांनी किती मानधन घेतले, जाणून घेऊयात.
रणबीर कपूरने किती मानधन घेतले?
रणबीर कपूर या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असल्याने त्याचे मानधन इतर कलाकारांच्या तुलनेत कितीतरी पट अधिक आहे. रिपोर्टनुसार, रणबीर कपूरची मार्केट वॅल्यू ही जवळपास 70 कोटी रुपये आहे. परंतु, या चित्रपटासाठी त्याने 50 टक्के कमी मानधन घेतले. या चित्रपटासाठी त्याने 35 कोटी रुपये मानधन घेतले आहे. मात्र, सोबतच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केल्यास त्यात देखील त्याला हिस्सेदारी मिळणार आहे. रणबीरने या आधी ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटासाठी 20-25 कोटी रुपये मानधन घेतले होते.
चित्रपटातील इतर कलाकारांनी किती मानधन घेतले?
चित्रपटात रश्मिका मंदाना, बॉबी देओल आणि अनिल कपूर यांची देखील चित्रपटात महत्त्वाची भूमिकात आहे. रणबीर कपूरच्या तुलनेत इतर कलाकारांचे मानधन कमी असले तरीही हा आकडा कोट्यावधी रुपयांच्या घरात आहे. चित्रपटासाठी रश्मिकाने 4 कोटी रुपये, बॉबी देओलने 4-5 कोटी रुपये आणि अनिल कपूरने 2 कोटी रुपये मानधन घेतले आहे.
चित्रपट बॉक्स ऑफिसवर 500 कोटींची कमाई करण्याची शक्यता
‘अॅनिमल’च्या ट्रेलरला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर 24 तासांच्या आत 50 मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले होते. रिलीजआधीच चित्रपटाच्या 8 लाख तिकिटांची विक्री झाली होती. अॅडव्हान्स बुकिंगमध्ये चित्रपटाने जवळपास 23 कोटी रुपयांची कमाई केली होती.
त्यामुळे हा गदर-2, पठाण आणि जवाननंतर या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरण्याची शक्यता आहे. चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम भाषेत रिलीज झालेला हा चित्रपट 500 कोटींची कमाई करण्याची शक्यता आहे.