रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे धाकटे सुपुत्र अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचा रोका सोहळा (Engagement) म्हणजेच साखरपुडा राजस्थानच्या (Rajasthan) श्रीनाथजी देवळात 29 डिसेंबर रोजी पार पडला. जवळचे मित्र आणि नातेवाईक यांच्या सानिध्यात पार पडलेला हा सोहळा आणि त्यातले राज-भोग श्रृंगार विधी दिवसभर सुरू होते. त्यानंतर रिलायन्स उद्योग समुहातर्फे देशातले मान्यवर आणि सेलिब्रिटी यांना जंगी पार्टीही देण्यात आली.
27 वर्षीय अनंत अंबानी यांच्याकडे रिलायन्स समुहातल्या ऊर्जा कंपन्यांची जबाबदारी आहे. राधिका मर्चंट यांच्याशी त्यांची काही वर्षांपासूनची मैत्री आहे. आणि ती आता नात्यामध्ये बदलणार आहे. राधिका या आरोग्य क्षेत्रातली अग्रणी कंपनी एनकोअर हेल्थकेअरचे मालक विरेन मर्चंट यांची मुलगी आहे. त्यांच्या आईचं नाव शैला मर्चंट आहे. तर त्यांना एक मोठी बहीण आहे अंजली मर्चंट. राधिका यांच्याबद्दल अधिक जाणून घेऊया…
शिक्षण : मुंबईत शालेय शिक्षण घेतल्यानंतर राधिका यांनं पुढचं शिक्षण अमेरिकेत झालं आहे. न्यूयॉर्क विद्यापीठातून त्यांनी राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयात स्नातक पदवी घेतली आहे. शिक्षण संपल्यानंतर रिअल इस्टेट एजन्सी इस्प्रावामध्ये त्यांनी आलिशान घरांसाठी डिझायनर म्हणून काम केलं आहे.
सध्या त्या वडिलांची कंपनी एन्कोअर हेल्थकेअरमध्ये संचालक मंडळात आहेत.
भरतनाट्यमची आवड : आपली होणारी सासू नीता अंबानी यांच्याप्रमाणेच राधिका मर्चंट यांनाही शास्त्रीय नृत्याची आवड आहे. आणि अलीकडेच भरतनाट्यम प्रकारात त्यांनी आपलं विशारद पूर्ण केलं आहे. त्या निमित्ताने झालेल्या अरंगेत्रम कार्यक्रमाला संपूर्ण अंबानी कुटुंबीयांनी हजेरी लावली होती.
राजस्थानच्या नाथद्वारमध्ये रोका विधी पार पडल्यानंतर अनंत आणि राधिका यांचं अंबानी यांचं निवासस्थान अँटिलिया इथं स्वागत करण्यात आलं. आणि तिथेच साखरपुड्याची पार्टीही आयोजित करण्यात आली होती. येत्या काही महिन्यांत दोघांचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे.