जागतिक स्तरावर नावाजलेली ई-कॉमर्स कंपनी म्हणून Amazon ला भारतात मोठी पसंती दर्शवली जाते. कंपनी दिवसेंदिवस आपले कार्यक्षेत्र विस्तारताना दिसत आहे. अशातच आता ग्राहकांना फास्ट नाही तर सुपरफास्ट डिलिव्हरी देण्यासाठी अमेझॉनने कंबर कसली आहे. ग्राहकांना वेळेत आणि वेगवान डिलिव्हरी प्रदान व्हावी यासाठी कंपनीने आता थेट इंडियन रेल्वेशी सामंजस्य करार केला आहे.
Table of contents [Show]
इंडियन रेल्वेसोबत पहिल्यांदाच करार
पार्सल वाहतुकीसाठी इंडियन रेल्वेशी असा सामंजस्य करार करणारी अमेझॉन ही पहिली ई-कॉमर्स वेबसाइट ठरली आहे. तसे पाहायला गेले तर इंडियन पोस्ट आणि इंडियन रेल्वे दरम्यान गेली अनेक वर्षे पार्सल ट्रान्सफरचा सामंजस्य करार सुरु आहे. भारतात विस्तीर्ण पसरलेल्या रेल्वेच्या जाळ्याचा उपयोग ग्राहकांना त्यांच्या गरजेचे सामान लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी केला जाणार आहे.
जलद सेवेचा निर्धार
भारतीय रेल्वेच्या माध्यमातून आमच्या ग्राहकांना आम्हाला जलद सेवा देणे शक्य होणार असल्याचे अमेझॉन इंडियाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. तसेच ग्राहक आणि विक्रेते यांना देखील यानिमित्ताने नव्या सुविधेचा अनुभव घेता येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
इंडियन पोस्टाशी देखील करार
इंडियन रेल्वेच्या आधी अमेझॉनने इंडियन पोस्टाशी देखील सामंजस्य करार केला आहे. याद्वारे भारताबाहेर ज्यांना वस्तू कुरियर करायच्या आहेत त्यांना इंडियन पोस्टच्या मदतीने अमेझॉनद्वारे सेवा प्रदान केली जाते. भारताबाहेर राहणारे भारतीय नागरिक, एनआरआय या योजनेचा लाभ घेताना दिसत आहेत. या योजनेचा अनेकांनी फायदा घेतला असून दिवसेंदिवस ग्राहकसंख्या वाढत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
वितरण व्यवस्थेत एआयचा होणार वापर
अमेझॉनच्या अमेरिकास्थित मुख्यालयाने दोन महिन्यांपूर्वी पार्सल वितरण व्यवस्थेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (Artificial Intelligence) वापर करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता अमेझॉन इंडियाने देखील एआयचा वापर करण्याची घोषणा केली आहे.
पार्सलचे वितरण करताना अनेकदा सामानाचे नुकसान होते, त्यामुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. ही समस्या दूर करण्यासाठी अमेझॉनच्या गोदामांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने पार्सल वस्तूंची सद्यस्थिती जाणून घेतली जाणार आहे आणि वस्तू हाताळताना कुठली काळजी घेतली जावी याचे मार्गदर्शन डिलिव्हरी करणाऱ्या कामगारांना दिले जाणार आहे.