प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अमेरिका भेट भारतासाठी महत्वाची होती. या भेटीदरम्यान प्रधानमंत्र्यांनी अमेरिकेतील बड्या उद्योगपतींशी देखील संवाद साधला. याचाच परिणाम म्हणून ॲमेझॉनने देखील भारतात गुंतवणूक वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच भारतात रोजगार निर्मिती करण्याचे आश्वासन देखील कंपनीने दिले आहे.
जगातील दिग्गज ई-कॉमर्स कंपनी समजल्या जाणाऱ्या ॲमेझॉनने येणाऱ्या काळात थोड्याथोडक्या नाही तर तब्बल 20 लाख रोजगार निर्मितीचे आश्वासन दिले आहे. याची माहिती खुद्द माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दिली आहे. र्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून त्यांनी ही माहिती दिली आहे.
गुंतवणूक वाढवणार
माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ॲमेझॉन इंडियाकडून येणाऱ्या काळात भारतात गुंतवणूक वाढवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अमेरिका भेटीत ॲमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अँडी जॅसी यांची देखील भेट घेतली होती. भारतात स्टार्ट अप उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यावर या दोघांमध्ये चर्चा झाली होती. या भेटीनंतर अँडी जॅसी यांनी ही माहिती दिली आहे. येत्या सात वर्षात, म्हणजेच 2030 पर्यंत भारतात 26 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली जाणार असून यातून देशभरात 20 लाख रोजगार निर्माण होणार आहेत.
This big investment commitment by @amazonIN is to invest $26 billion by 2030 and create 20 Lakh jobs in India - is consistent wth PM @narendramodi ji’s vision of a Digital and Self-Reliant India n will help further deepen the #AI(America-India) tech partnership#ModiInUSA… https://t.co/HUJlI88k1K
— Rajeev Chandrasekhar ?? (@Rajeev_GoI) June 24, 2023
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेला या गुंतवणुकीमुळे मोठा फायदा होणार आहे असे माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी म्हटले आहे.
अतिरिक्त 15 अब्ज डॉलरची गुंतवणूक
ॲमेझॉनचे CEO अँडी जॅसी यांनी म्हटले आहे की, येत्या काही काळात भारतात ते अतिरिक्त 15 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहेत. त्यासाठी त्यांचे नियोजन सुरु असून त्यावर लवकरच कारवाई केली जाणार आहे. भारतात ॲमेझॉनने याआधीच 11 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. आता नव्याने 15 अब्ज डॉलरची गुंतवणूक केल्यानंतर एकूण 26 अब्ज डॉलर ॲमेझॉन भारतात गुंतवणार आहे.
स्टार्टअप्सला होणार फायदा
Amazon भारतातील सर्वात मोठ्या गुंतवणूकदारांपैकी एक आहे. प्रधानमंत्र्यांच्या अमेरिका भेटीत भारतातील लॉजिस्टिक क्षेत्रात आणि ई-कॉमर्स क्षेत्रात Amazon सोबत सहकार्य वाढवण्याच्या शक्यतेवर चर्चा झाली होती. गेल्या काही वर्षांपासून देशात स्टार्टअप्स मोठ्या प्रमाणात सुरु झाले आहेत. भारतातील एमएसएमईच्या डिजिटायझेशनला प्रोत्साहन देण्यासाठी ॲमेझॉन प्रयत्न करणार आहे.