• 07 Dec, 2022 08:40

Amazon faces protests and strikes : 40हून अधिक देशांमधील कर्मचारी संपाच्या मार्गावर!

Amazon faces protests and strikes

Image Source : www.bloomberg.com

Amazon faces protests and strikes : आजपासून ब्लॅक फ्रायडे सेल संपूर्ण जगभर सुरू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर 40 देशांमधील हजारो Amazonमधील कर्मचाऱ्यांनी पगारवाढीसाठी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

Amazon या ई-कॉमर्स कंपनीचा विस्तार संपूर्ण जगभरात झाला आहे. या कंपनीच्या अमेरिका, इंग्लंड, भारत, जपान, ऑस्ट्रेलिया, साऊथ अफ्रिका आणि युरोपमधील 40हून अधिक देशांमधील कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या नावाने निषेध व्यक्त करत पगार वाढीसाठी (Make Amazon Pay) संप पुकारला आहे.

Amazon मधील कर्मचाऱ्यांनी बरोबर ब्लॅक फ्रायडे सेलच्या पार्श्वभूमीवर हा संप पुकारला आहे. Thankgiving Day नंतर ख्रिसमस खरेदीचा हंगाम सुरू होतो. या हंगामाची सुरूवात ब्लॅक फ्रायडे सेलने (Black Friday Sale) होते. ब्लॅक फ्रायडे हा दिवस ऑनलाईन खरेदीसाठी सर्वांत महत्त्वाचा दिवस मानला जातो. या सेलमध्ये अनेक ब्रॅण्डसवर भरमसाठ सवलत दिली जाते. त्यामुळे या सेलसाठी ग्राहकांची मोठी झुंबड उडालेली असते. नेमका याचाच आधार घेत Amazon मधील कर्मचाऱ्यांनी पगारवाढीची मागणी केली केली आहे. कारण सध्या जगभरात वाढत्या महागाईने सगळ्यांनाच होरपळून काढले आहे. त्यात दैनंदिन राहणीमानाचा खर्चही वाढला आहे. त्या तुलनेत कामगारांच्या पगारात वाढ होत नसल्याचे अॅमेझॉनमधील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी ऐन खरेदीच्या हंगामात संपाचे हत्यार उपसले आहे.

जेफ बेझॉस यांच्या घरासमोर कर्मचाऱ्यांची निदर्शने!

अॅमेझॉनमधील कर्मचारी आणि काही कामगारांनी अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या न्यूयॉर्कमधील घरासमोर निदर्शने करण्याचा प्लॅन केला आहे. या कामगारांनी ब्लॅक फ्रायडे या दिवसाला Make Amazon Pay असे नाव देत निषेध व्यक्त केला आहे.

खर्च नियंत्रित करण्यासाठी कामगार कपात!

जगभर सुरू असलेल्या आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर अॅमेझॉनसुद्धा कंपनीतील खर्च नियंत्रित करण्याच्या दृष्टिने कामगार कपात करण्याचा विचार करत आहे. न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, अॅमेझॉन त्यांच्या वेगवेगळ्या विभागातील एकूण 10 हजार कर्मचाऱ्यांना कमी करू शकते. याचा थेट परिणाम अॅमेझॉनच्या वेअरहाऊसमध्ये काम करणाऱ्या कामगारांवर होण्याची शक्यता आहे.

भारतातील कर्मचाऱ्यांकडून राजीनामा घेणार!

अॅमेझॉन भारतातील कर्मचार्‍यांकडून स्वेच्छेने राजीनामा घेणार असल्याचे वृत्त आहे. या बदल्यात त्या कर्मचाऱ्यांना थोड्याफार प्रमाणात आर्थिक लाभ दिला जाणार आहे, असे सांगितले जाते. दरम्यान अॅमेझॉन कंपनी ऑगस्ट 2023 पासून टप्प्याटप्प्याने देशातील एज्युटेक सर्व्हिसेस आणि ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म (Amazon Academy) बंद करणार आहे.

या पार्श्वभूमीवर ट्विटर नंतर मेटा, गुगल आणि आता अॅमेझॉनमध्ये कामगार कपात सुरू केल्याने आर्थिक मंदीची झळ जाणवू लागणार अशी चिन्हे दिसत आहेत. अॅमेझॉनच्या या निर्णयामुळे अनेकांच्या नोकरीवर गदा येणार आहे.