गो फर्स्ट एयरलाईन्सनंतर आता अकासा एअरलाईन्स ही विमान कंपनी बंद होण्याचा मार्गावर आहे. होय, ही माहिती स्वतः या विमान कंपनीने उच्च न्यायालयात सादर केली आहे. या कंपनीने मागच्याच वर्षी भारतात व्यापार करण्यास सुरुवात केली होती. आता वर्षभरात या कंपनीला टाळे लागण्याच्या परिस्थिती उद्भवली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांनी लागोपाठ राजीनामा देण्याचे सूत्र सुरु केले होते. यानिमित्ताने कंपनीत काहीतरी मोठ्या घडामोडी घडतील असा कयास जाणकारांनी व्यक्त केला होता. आता कंपनीने उच्च न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार कंपनी लवकरच त्यांचे कामकाज बंद करणार असल्याचे वृत्त आहे.
आर्थिक संकटात विमान कंपनी
अकासा विमान कंपनी सध्या आर्थिक संकटात असून कंपनीच्या जवळपास 43 वैमानिकांनी राजीनामे दिले आहेत. कंपनीकडे कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी पैसे नसल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिल्यामुळे अनेक उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. आतापर्यंत कंपनीची 24 उड्डाणे रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे.
उच्च न्यायालयात प्रकरण का गेले?
43 वैमानिकांच्या राजीनाम्यानंतर कंपनीचे परिचालन प्रभावित झाले आहे. वैमानिकांनी नोकरीचा राजीनामा देताना कंपनीच्या नियम अटींचे पालन केले नाही असा आरोप कंपनीने लावला आहे. राजीनामा दिल्यानंतर वैमानिकांनी नोटीस पिरिएड सर्व्ह करणे आवश्यक आहे, मात्र वैमानिकांनी राजीनामा देत थेट प्रतिस्पर्धी कंपनी जॉईन केली आहे. नियम व अटींचे पालन न केल्यामुळे अकासा एयरलाईन्स राजीनामा दिलेल्या वैमानिकांच्या विरोधात हायकोर्टात पोहोचली आहे.
प्रवाशांच्या पैशाचे काय होणार?
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानाच्या (DGCA) नियमानुसार कंपनीला त्यांचे परिचालन बंद झाल्यानंतरही ग्राहकांना पैसे परत करावे लागतात. ज्या प्रवाशांनी आगाऊ विमान तिकीट बुक केले आहेत त्यांचे पैसे कंपनी लवकरच परत करणार आहे. ‘गो फर्स्ट’ या विमान कंपनीवर दिवाळखोरीची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर कंपनीने ग्राहकांना पैसे परत देण्यासाठी स्वतंत्र पोर्टल बनवले आहे.