Airplane Order: देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय नागरी प्रवासी वाहतुकीत मोठी वाढ होत आहे. कोरोनानंतर विमान वाहतूक क्षेत्राने उभारी घेतली आहे. नुकतेच टाटा ग्रुपच्या मालकीच्या एअर इंडियाने 470 विमनांची ऑर्डर बोइंग आणि एअरबस या कंपन्यांना दिली. तर मोठ्या प्रमाणात नोकरभरतीही सुरू केली आहे. दरम्यान, आकासा या स्टार्टअप विमान कंपनीनेही चालू वर्षात नव्या विमानांची मोठी ऑर्डर देण्याची घोषणा केली आहे.
आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीत उतरणार(Akasa Airlines will enter into international travel)
देशांतर्गत व्यवसायातील संधींबरोबरच आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक क्षेत्रात हिस्सा मिळवण्यासाठी आकासाने नियोजन आखले आहे. नॅरो बॉडी विमानांची मोठी ऑर्डर कंपनीकडून येत्या काळात देण्यात येणार आहे. आकासा एअरलाइन्स सुरू होऊन फक्त 200 दिवस झाले आहेत. सध्या कंपनीने 72 विमानांची ऑर्डर दिली आहे. यापैकी 17 बोइंग 737 MAX नुकतेच मिळाले आहेत. तर इतर विमानांची डिलिव्हरी पुढील महिन्यात मिळणार आहे. कंपनीचे संस्थापक विनय दुबे यांनी या बातमीस दुजोरा दिला आहे.
कोरोनानंतर प्रवासी वाढले (Air traveler increased after covid)
विनय दुबे हे जेट एअरवेज कंपनीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. मात्र, जेट एअरवेज कंपनी दिवाळखोरीत निघाल्यानंतर त्यांनी आकासा ही कंपनी सुरू केली. ही ऑर्डर बोईंग की एअरबस कंपनीला दिला जाणार, याबद्दल त्यांनी माहिती दिली नाही. कोरोनानंतर प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र, सेवा पुरवण्यास सध्याची विमाने अपुरी पडत असल्याने कंपनीने नव्या विमानांची ऑर्डर देण्याचे नियोजन केले आहे.
मेट्रो शहरांना लहान शहरे जोडणार
भारतातील विमान कंपन्यांकडे येत्या काही वर्षात पंधराशे ते सतराशे नवी विमाने ताफ्यात दाखल होतील, असे CAPA India या कंन्सल्टिंग फर्मने म्हटले आहे. वर्ष अखेरीस परदेशात फ्लाइट सुरू करण्याचे नियोजन आकासा एअरलाइन्सने आखले आहे. भारतातील मेट्रो शहरे छोट्या शहरांना फ्लाइट्सने जोडण्याचे उद्दिष्ट आकासा एअरलाइन्सचे आहे. तिकिटांचे दर जास्त असले तरीही डिमांड वाढत असल्याचे दिसून येत आहे.
टाटा एअरलाइन्सकडूनही विस्तार
नुकतेच एअर इंडियाने 470 नव्या विमानांची ऑर्डर दिली आहे. जुनी विमाने ताफ्यातून काढून टाकून नवी विमाने घेण्यात येणार आहे. बोइंग आणि एअरबस या दोन कंपन्यांना नव्या विमानांची ऑर्डर टाटाने दिली आहे. यातील काही विमानांना रोल्स रॉयल्स कंपनीचे टर्बो इंजिन्स बसवण्यात येणार आहे. सोबतच टाटा कंपनीने पायलटसह कू मेंबर्सची मेगा भरतीची घोषणा केली आहे.