Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Ajay Banga: पुण्याचे अजय बंगा यांची वर्ल्ड बँकेच्या प्रमुखपदी बिनविरोध निवड होणार

Ajay Banga

वर्ल्ड बँकेच्या प्रमुखपदी उमेदवारांची शिफारस करण्याची मुदत संपली असून इतर देशांनी कोणत्याही नावाची शिफारस केली नाही. त्यामुळे अजय बंगा यांची निवड निश्चित समजली जाते. प्रतिष्ठित अशा जागतिक बँकेचे प्रमुखपद भुषवण्याचा मान एका भारतीय वंशाच्या व्यक्तीला मिळणार आहे. पुण्यातील खडकी कंन्टोनमेंट येथे त्यांचा जन्म झाला आहे.

Ajay Banga World Bank: भारतीय वंशाचे आणि त्यातही पुण्यात जन्मलेले अजय बंगा यांची जागतिक बँकेच्या (World Bank) प्रमुखपदी बिनविरोध निवड होऊ शकते. अजय बंगा हे इंडियन अमेरिकन वंशाचे असून त्यांना अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रमुख पदावर काम करण्याचा अनुभव आहे. अमेरिकेतील जो बायडेन प्रशासनाने त्यांच्या नावाची शिफारस केली होती. 

वर्ल्ड बँकेच्या प्रमुखपदी उमेदवारांची शिफारस करण्याची मुदत संपली असून इतर देशांनी कोणत्याही नावाची शिफारस केली नाही. त्यामुळे अजय बंगा यांची निवड निश्चित समजली जाते. प्रतिष्ठित अशा जागतिक बँकेचे प्रमुखपद भुषवण्याचा मान एका भारतीय वंशाच्या व्यक्तीला मिळणार आहे.

पुण्यातील खडकी येथे जन्म (Ajay Banga birthplace)

अजय बंगा हे मुळचे पंजाबमधील जालंधर येथील आहेत. मात्र, त्यांचे वडील पुण्यातील खडकी येथे लष्करी अधिकारी होते. खडकी कंन्टोनमेंट येथेच त्यांचा जन्म झाला आहे. भारतामध्ये उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी परदेशातील अनेक बड्या कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या जबाबदार्‍या सांभाळल्या आहेत. मास्टर कार्ड कंपनीचे सीइओ म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. या कंपनीमध्ये त्यांनी 12 वर्ष काम केले आहे.

जागतिक बँकेकडून जगभरातील अनेक गरीब आणि विकसनशील देशांमध्ये समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. यासाठी मोठ्या निधीची गरज पडते. हा निधी गोळा करण्यासाठी जागतिक बँकेचा प्रमुख महत्त्वाची भूमिका निभावत असतो. विविध कॉर्पोरेट्स कंपन्या, सरकारी संस्था, जागतिक कार्यालये, देशांचे प्रतिनिधी यांच्यासोबत चांगले संबंध असणाऱ्या व्यक्तीची या पदी नियुक्ती केली जाते. पर्यावरण, आर्थिक समावेशकता या क्षेत्रामध्ये काम केल्याचा अनुभव अजय बंगा यांच्याकडे आहे. त्यामुळेच जो बायडेन यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली होती. अजय बंगा मे महिन्यामध्ये पदाचा कार्यभार सांभाळतील. 

प्रमुखपदासाठी उमेदवारांची शिफारस करण्यासाठी सुमारे एक महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. मात्र, या काळात इतर देशांनी कोणत्याही व्यक्तीची शिफारस केली नाही. फक्त अमेरिकेने अजय बंगा यांची शिफारस केली. त्यामुळे या शर्यतीत बंगा हे एकमेव उमेदवार आहेत. मास्टरकार्ड या कंपनीचे प्रमुखपद बंगा यांनी सांभाळले आहे. तसेच सध्या ते जनरल अटलांटिक कंपनीचे उपसंचालक पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. 

निवड प्रक्रियेचा पुढचा टप्पा जागतिक बँकेकडून लवकरच सांगितला जाणार आहे. सध्या डेव्हिड मालपास हे जागतिक बँकेचे प्रमुख आहेत. जूनमध्ये ते निवृत्त झाल्यानंतर त्यांची जागा बंगा घेतील. हे पद भुषवणारे ते पहिले भारतीय-अमेरिकन आणि शीख-अमेरिकन ठरतील. पर्यावरण बदलाबाबत विद्यमान प्रमुख डेविड मालपास यांचे जे काही विचार आहेत, त्यावर मोठी टीका झाली होती. त्यामुळे त्यांचे हे पद वादात सापडले होते.