गेल्या एकाही दिवसांपासून हिरव्या पालेभाज्या, टोमॅटो, जिरे, कांदा या रोजच्या गरजेच्या जिन्नस कमालीचे महागले आहेत. याचा फटका अर्थात सर्वसामान्य ग्राहकांना बसताना दिसतो आहे. अशातच आता लसणाचे भाव देखील गडगडले आहेत. टोमॅटोने केव्हाच 200 रुपये किलोचा टप्पा पार केला आहे, त्यांनतर आता लसूण देखील किरकोळ बाजारात 230-240 रुपये किलो दराने विकला जात आहे. तर घाऊक बाजारात लसूण 180-190 रुपये किलो दराने विक्रीसाठी उपलब्ध आहे. लसणाच्या वाढत्या किमतीमुळे ‘फोडणी’ तर महागली आहेच, परंतु सामन्यांच्या खिशावर देखील त्याचा अतिरिक्त भार पडताना दिसतो आहे.
यंदा लागवड कमी!
बाजारात लसणाची आवक घटल्यामुळे लसणाचे भाव वाढले आहेत. मुंबई, पुण्यात, ठाण्यात तर 50% हून कमी आवक झाली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे यावर्षीचा अवकाळी पासून आणि लांबलेला उन्हाळा. फेब्रुवारी-मार्च मध्ये महाराष्ट्रात आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान केले होते. त्यामुळे उत्पन्न कमी निघाले आहे. महाराष्ट्रात मुख्यत्वे गुजरात आणि राजस्थान या दोन राज्यांमधून लसणाची आवक होते, मात्र या राज्यांमध्ये समाधानकारक उत्पन्न न झाल्यामुळे आवक घटली आहे आणि मागणी जास्त असल्यामुळे लसणाचे भाव देखील गगनाला भिडले आहेत.
आणखी भाववाढ होण्याची चिन्हे
एकीकडे आवक घटल्यामुळे लसणाचे भाव वाढले असताना, गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याचे चित्र आहे. अशीच परिस्थिती राहिली तर येणाऱ्या काही दिवसांत लसणाचे भाव आणखी वाढतील असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. किरकोळ बाजारात लसूण महाग झाल्यामुळे ग्राहकांनी लसूण खरेदी करताना हात आखूड केल्याचे दिसते आहे. आधीच महागाईने हैराण असलेल्या सामान्यांनी आता बाजारात आयत्या मिळणाऱ्या ‘लसूण पेस्ट’ चा वापर वाढवला आहे. 10-20 रुपयांत मिळणारी पेस्ट सध्या तेजीत आहे असे दुकानदारांनी म्हटले आहे.