बिझनेस टायकून रतन टाटा (Ratan Tata) यांच्या नम्र स्वभावाच्या आणि उदारतेच्या अनेक कथा आपल्याला माहीत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे रतन टाटा आणि अदिती भोसले वाळुंज (Aditi Bhosale Walunj) व चेतन वाळुंज (Chetan Walunj) यांची अविस्मरणीय भेट.
हे जोडपं पुण्यामध्ये रेपोस एनर्जी (Repos Energy) नावाचा स्टार्टअप चालवतं. त्यांनी सेंद्रिय कचऱ्यावर चालणारे 'मोबाईल इलेक्ट्रिक चार्जिंग व्हेईकल' लाँच केले आहे. याशिवाय ती कंपनी मोबाईल इंधन स्टेशनसाठी एटीएमप्रमाणे काम करते. म्हणजे वेगवेगळ्या उद्योगांना त्यांच्या डोअर स्टेपवर इंधन मिळवून देण्यासाठी मदत करते. या इंधनाची चोरी रोखण्यासाठी आणि इंधनाच्या वापरावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी 2,000 मोबाईल इंधन केंद्र स्थापन केली आहेत.
जेव्हा रेपोस एनर्जी (Repos Energy) हा व्यवसाय उभारण्यासाठी त्यांची धडपड चालू होती, त्यावेळी त्यांना मार्गदर्शना खातर रतन टाटांना भेटायचं होतं. हे जोडपं रतन टाटांना भेटण्यासाठी मुंबईला आलं खरं, पण टाटांना भेटण्यासाठी त्यांना तब्बल 12 तास वाट पाहावी लागली असा एक रंजक किस्सा अदितीने तिच्या Linkedin वर शेअर केला. नेमका काय आहे किस्सा, चला जाणून घेऊयात.
नेमका काय आहे तो किस्सा?
पुण्यातील आदिती भोसले वाळुंज (Aditi Bhosale Walunj) आणि चेतन वाळुंज (Chetan Walunj) यांनी रेपोस एनर्जी (Repos Energy) नावाचा स्टार्टअप व्यवसाय सुरू केला आहे. आदिती सांगते की, एके दिवशी मी आणि चेतन कामासंदर्भात चर्चा करत होतो. मुळात आम्ही कोणत्याही औपचारिक शिक्षणाशिवाय रेपोस एनर्जी व्यवसाय चालू केला. मी सद्गुरुंकडून शिकले की, आपली दृष्टी ही नेहमी मोठी असावी. चेतनने आणि मी, ही गोष्टी मनापासून ऐकली आणि रेपोस एनर्जी स्टार्टअप सुरु केलं. आम्हाला वाटतयचं की, आम्हाला एखादा मार्गदर्शक असावा. जो आम्हाला मी आणि मायसेल्फच्या पलीकडे जाऊन मार्गदर्शन करेल.
असा मार्गदर्शक कोण? यावर आम्ही चर्चा करत होतो. साहजिकच यावर दोघांचं एकमताने उत्तर आलं, रतन टाटा (Ratan Tata) सर. मी चेतनला म्हटलं, जाऊया का त्यांना भेटायला? त्यावर चेतन मला म्हणाला, ते काय आपले शेजारी आहेत का, लगेच भेटायला. पण आम्हा दोघांची त्यांना भेटण्याची प्रचंड ईच्छा होती, त्यामुळे आम्ही बॅगा भरल्या आणि मुंबईला रवाना झालो.
टाटांशी संबंधित असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी आम्ही संपर्क साधला. भेटीपूर्वी टाटांना पत्रंही लिहिली. त्यांना भेटायचं म्हणून आम्ही आमच्याच व्यवसायासंदर्भात ऊर्जा वितरणात कसा बदल करु शकतो आणि तंत्रज्ञानाचा वापर करून कोणतीही ऊर्जा/इंधन शेवटच्या माईलपर्यंत कसे पोहोचवू शकतो, असं एक 3D प्रेझेंटेशन पण बनवलं. त्यानंतर आम्ही टाटांच्या घराबाहेर जाऊन उभे राहिलो. मात्र कामात व्यस्त असणारे टाटा आम्हाला काही भेटले नाहीत.
तब्बल 12 तास आम्ही त्यांच्या घराबाहेर उभे होतो. शेवटी वैतागून आम्ही हॉटेलवर परतलो. मन उदास झालं होतं. तितक्यात एक फोन वाजला. निराशेमुळे फोन उचलण्याचीही इच्छाही नव्हती. पण फोन उचलला आणि समोरून आवाज ऐकू आला. "हॅलो, मी रतन टाटा बोलतोय... अदितीशी बोलू शकतो का?" हा आवाज ऐकून डोळ्यातुन आपसूक पाणी आलं. टाटा म्हणाले तुमचं पत्र मिळालं. आपण भेटून बोलूयात का? त्यांनी आम्हाला दुसऱ्या दिवशीची सकाळची वेळ दिली.
दुसऱ्या दिवशी सकाळी 10: 45 च्या सुमारास आम्ही टाटांच्या दिवाणखान्यात प्रेझेंटेशनसोबत हजर होतो. ठीक सकाळी 11 वाजता समोरून एक निळा शर्ट घातलेला एक उंच, गोरा माणूस आमच्या दिशेने चालू लागला. आम्ही फक्त पाहतच राहिलो. त्यानंतर 11 ते 2 असे 3 तास आम्ही प्रेझेंटेशनवर बोलत होतो. त्यांनी मला विचारलं की, तुम्हाला माझ्याकडून काय अपेक्षा आहेत. आम्ही म्हणालो, “सर, आम्हाला लोकांची सेवा करण्यास आणि देशाला जागतिक पातळीवर नेण्यास मदत करा, आम्हाला मार्गदर्शन करा” ते म्हणाले ठीक आहे. 3 तासाच्या भेटीनंतर, आपण ज्याप्रमाणे मंदिरातून शांत होऊन बाहेर पडतो, अगदी त्याचप्रमाणे आम्ही बाहेर पडलो. कोणतीही गोष्ट अशक्य नसते हे आम्हाला त्या दिवशी कळालं.
Repos Energy मध्ये टाटांकडून गुंतवणूक
अदिती भोसले वाळुंज व चेतन वाळुंज यांनी दिलेल्या प्रेझेंटेशनवर प्रभावित होऊन रतन टाटा यांनी Repos Energy मध्ये दोनदा गुंतवणूक केली. ही कंपनी सध्या भारतातील 188 शहरांमध्ये कार्यरत असून आजच्या घडीला हजाराहून अधिक कंपनीचे व्यावसायिक भागीदार आहेत. मे 2022 मध्ये कंपनीला टाटा समूहाकडून 56 कोटी रुपयांचा निधी मिळाला. आत्ताच्या घडीला कंपनी अनेक पटींनी वाढली असून यावर्षी कंपनीला 185 कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.
अदितीने सांगते की, तिची कंपनी मोबाईल इंधन स्टेशनसाठी एटीएमप्रमाणे काम करते. मुळात, ती वेगवेगळ्या उद्योगांना त्यांच्या डोअर स्टेपवर इंधन मिळवून देण्यासाठी मदत करते. या इंधनाची चोरी रोखण्यासाठी आणि इंधनाच्या वापरावर लक्ष ठेवण्यासाठी सुद्धा मदत केली जाते. आजतागायत Repos Energy ची 2,000 मोबाईल इंधन केंद्रे तैनात करण्यात आली आहेत.