Birthday Special: भाराताचे अनमोल रत्न रतन नवल टाटा! भारतातले प्रसिद्ध उद्योगपती म्हणून संपूर्ण जगाला त्यांची प्रचिती आहे. टाटा कुटुंबाने आणि रतन टाटा यांनी केवळ त्यांचा उद्योगच मोठा केला नाही, तर यासह देशाची समृद्धी आणि प्रगती व्हावी यासाठी कायम प्रयत्न केले. प्रत्येक भारतीयाच्या मनात रतन टाटांविषयी आदर, प्रेम आणि सन्मान आहे. रतन टाटांकडे आलेला उद्योगाचा वारसा, त्यांनी मोठ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे.
रतन टाटा यांनी यांचे कर्तृत्त्व, त्यांची कामगिरी, त्यांचे यश, त्यांनी केलेली समाजोपयोगी कामे हे एका लेखात लिहिणे अशक्य आहे. मात्र त्यांच्याबद्दलच्या काही रंजक गोष्टी वाचा आणि त्यातून प्रेरणा घ्या -
रतन टाटांविषयीच्या 10 रंजक गोष्टी 10 Interesting Facts About Ratan Tata -
- रतन टाटा यांनी मुंबईतील कॅम्पियन स्कूल येथे आपले शालेय शिक्षण घेतले. यानंतर कॅथेड्रल अँड जॉन कॉनन स्कूल आणि शिमला येथील बिशप कॉटन स्कूल येथून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. 1955 मध्ये रतन टाटा यांनी न्यूयॉर्क सिटीमधील रिवरडेल कंट्री स्कूल येथून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. तर 1959 मध्ये कॉर्नेल विद्यापीठातून आर्टिटेक्चरची पदवी घेतली. यासह हार्वर्ड बिझनेस स्कूल येथून अॅडवान्स्ड मॅनेजमेंट प्रोग्रामही पूर्ण केला. अमेरिकेत शिक्षणासाठी वास्तव्य केले, त्या काळात टाटांनी हॉटेल, रेस्टरंटमध्ये छोट्या - मोठ्या नोकऱ्या केल्या.
- टाटा स्टीलमध्ये 1961 साली रतन टाटा यांची पहिली नोकरी लागली. स्फोट भट्टी आणि फावडे चुनखडीचे व्यवस्थापन करण्याची त्यांना जबाबदारी मिळाली होती. त्यानंतर पदोन्नती होत ते टाटा समुहाच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. वयाच्या अवघ्या एकवीसाव्या वर्षी त्यांनी 1991 मध्ये टाटा समुहाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून देण्याचे मोठे कार्य केले.
- रतन टाटांनी 1998 साली पहिली भारतीय बनावटीची टाटा इंडिका लाँच केली होती. ही भारतातील पहिली भारतीय बनावट आणि उत्पादीत केलेली कार ठरली. यानंतर त्यांनी टाटा सफारी ही पहिली एसयुव्ही कार लाँच केली होती.
- रतन टाटा, देशवासियांच्या गरजा समजून त्यानुसार त्यांना सोयी पुरवण्यासाठी कार्यरत असतात. एकदा त्यांनी चार जणांचे पूर्ण कुटुंब एकाच बाईकवरुन कसेबसे प्रवास करत आहेत, हे सामान्य चित्र त्यांनी प्रत्यक्ष पहिले. त्यावेळी या समस्येवर उपाय काढला तो म्हणजे, नॅनो!
टाटा नॅनो कारची घोषणा केल्यानंतर, कारची माहिती घेण्यासाठी, नोंदणी करण्यासाठी नागरिकांनी टाटाच्या वेबसाईटवर एवढी गर्दी केली की वेबसाईट क्रॅश झाली.
सामान्य व्यक्तीला कमीत कमी किंमतीत कार घेण्याचे स्वप्न पूर्ण करता यावे, यासाठी टाटाने नॅनो गाडी 2009 साली बाजारात आणली. एक लाखात कार, हे स्वप्नवत वाटणारी गोष्ट रतन टाटांनी सत्यात उतरवली आणि अनेक सामान्यांना कारमधून फिरण्याचा आनंद दिला. - 26/11 चा हल्ला, आजही त्या घटनेची आठवण झाली तरी मुंबईकरांच्या अंगावर काटा येतो. या हल्ल्यात टाटा ग्रुपच्या ताज महाल हॉटेलचे खूप नुकसान झाले, पण व्यवसाय आणि बिल्गिंडच्या शतीपुढे त्यांनी माणसांना अधिक महत्त्व दिले. रतन टाटांनी 'ताज पब्लिक सर्व्हिस वेलफेअर ट्रस्ट'ची स्थापना केली. या अंतर्गत हल्ल्यात जखमी झालेल्या, नुकसान झालेल्या व्यक्तींना मदत केली. ताज हॉटेलमधील जखमी स्टाफला योग्य ते उपचार दिले. सर्वांची स्वत: रुग्णालय, घरी जाऊन चौकशी केली. या ट्रस्टच्या माध्यमातून टाटा यांनी असंख्य उद्धवस्त झालेल्या व्यक्तींच्या आयुष्याला नवी दिशा दिली.
हे सर्व कार्य केल्यानंतर त्यांनी ताज महाल हॉटेलच्या बिल्डिंगच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. यातून त्यांच्यातली माणुसकीचे दर्शन होते. - टाटा समुहातील सर्व कंपन्यांच्या महसूल नफ्यातील 66 टक्के भाग हा चॅरिटेबल ट्रस्टकडे जातो. यानंतर हे सर्व पैसे विविध सामाजिक कार्यासांठी दिले जातात. स्वत: रतन टाटा शिक्षण, आरोग्य, विज्ञान आदी अनेक गोष्टींसाठी हे पैसे विभागून देतात. त्यांच्यामुळे आजा अनेक मुले शिक्षण घेत आहेत, गावापाड्यात वैद्यकीय सुविधा पोहोचत आहेत.
आपल्या उत्पन्नातील एवढा मोठा भाग स्वच्छेने समाजोपयोगी कामांसाठी देत आहेत, ही खूप मोठी गोष्ट आहे ज्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या मनात रतन टाटांविषयी आदर आहे. याच कारणामुळे रतन टाटा एवढे मोठे उद्योगपती असूनही, ते गर्भश्रीमंतांच्या यादीत (world's most richest person list) नाहीत. - रतन टाटांचे प्राणी प्रेम आता सगळ्यानाच माहिती आहे. यातही त्यांना कुत्रे खूप प्रिय आहेत. त्यांच्या मुंबईच्या कार्यालयाच्या संपूर्ण रस्त्यांवरील कुत्र्यांची देखभाल त्यांच्या कंपनीतर्फे घेतली जाते, यासाठी त्यांनी एक खास व्यक्तीची नियुक्ती केली आहे.
सातत्याने रस्त्यांवर कुत्र्यांचे गाडीखाली येऊन अपघात होतात. विशेषत: हे अपघात रात्री होतात, कारण वाहन चालकाला रात्रीच्या अंधारात व्यवस्थित दिसत नाही. यावर उपाय म्हणून रतन टाटांनी कुत्र्यांच्या गळ्यात विशिष्ट रंगाचा पट्टा बांधायचा असे सुचवले, जणेकरून वाहन चालकाला त्यावरुन कळेल की समोर कुत्रा आहे.
सध्या रस्यांवरील भटक्या कुत्र्यांच्या गळ्यात असे पट्टे बांधण्याचे काम संपूर्ण देशभरात मोटोपाव्ज (Motopaws) यांच्यामार्फत सुरू आहे. - रतन टाटा हे विमानांचे मोठे चाहते आहेत. त्यांना विमान उडवायलाही खूप आवडते. ते एक प्रशिक्षित आणि कुशल पायलट आहेत. 2007 मध्ये, रतन टाटा यांनी एफ - 16 फाल्कन हे विमान उडवले. हे एक डायनॅमिक लढाऊ विमान आहे. F-16 फाल्कन उडवणारे ते पहिले भारतीय ठरले.
- रतन टाटा सध्या भारतीय स्टार्टअपना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देत आहेत. त्यांनी ओला इलेक्ट्रिक्स, पेटीएम, लेन्सकार्ट, कार देखो, फर्स्ट क्राय इत्यादी स्टार्टअप कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. तसेच आणखी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक असल्याचे, त्यांनी माध्यमांना सांगितले आहे.
- नुकतेच, ट्विटर, मेटा, अॅमझॉन यांसारख्या बड्या कंपन्यांनी आर्थिक मंदीचा फटका बसल्याने अनेक कर्मचाऱ्यांना घरी बसवले. शिक्षित, कौशल्यपूर्ण, मेहनती व्यक्तींच्या नोकऱ्या गेल्यामुळे अनेक अडचणींचा सामना या व्यक्ती करत होत्या. अशावेळी रतन टाटांनी नोकऱ्या गेलल्या व्यक्तींना टाटा ग्रुपच्या विविध कंपन्यांतील पदांसाठी नियुक्त करण्याचे काम हाती घेतले.