Adani Investment In Sri Lanka: श्रीलंकेची अर्थव्यवस्था मागील एक वर्षांपासून दिवाळखोरीत निघाली आहे. कोणतीही नवी गुंतवणूक तेव्हापासून देशामध्ये आली नाही. मात्र, आता अदानी समूहातील ग्रीन एनर्जी कंपनी श्रीलंकेमध्ये पवनऊर्जा प्रकल्पावर काम करणार आहे. श्रीलंकेने अदानीच्या या प्रकल्पाला परवानगी दिली आहे. तब्बल 442 मिलियन डॉलर इतकी या प्रकल्पाचे मूल्य आहे. हिंडनबर्ग रिसर्च फर्मने घोटाळ्याचे आरोप केल्यानंतर अदानी ग्रूपही अडचणीतून जात आहे. दरम्यान, दिलासा देणारी बातमी पुढे आली आहे.
दिवाळखोर श्रीलंकेत पहिल्यांदाच मोठी गुंतवणूक
श्रीलंका दिवाळखोरीत निघाल्यानंतर कोणत्याही देशाने तेथे गुंतवणूक केली नव्हती. तसेच श्रीलंकेकडे देण्यासाठी पैसेही शिल्लक नव्हते. अद्यापही अर्थव्यवस्था पूर्णपणे सुधारलेली नाही. मात्र, आता परकीय गुंतवणुकीला परवानगी दिली आहे. 442 मिलियन डॉलरच्या प्रोजेक्टला श्रीलंका सरकारने परवानगी दिली आहे. अदानी समूहावरही मागील काही दिवसांपासून गैरव्यवहाराचे आरोप होत आहे. त्यामुळे हा प्रकल्प मिळाल्याने अदानी समूहातील ग्रीन एनर्जी कंपनीला फायदा होऊ शकतो.
श्रीलंकेच्या उत्तरेकडे उभारणार पवन ऊर्जा प्रकल्प (Adani wind power plant in Shri Lanka)
श्रींलका देशाच्या उत्तरेकडील जाफना भागात अदानी ग्रीन या कंपनीकडून दोन पवन ऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. 2025 पर्यंत श्रीलंकेच्या नॅशनल एनर्जी ग्रीडद्वारे देशभरात या पवनऊर्जा प्रकल्पातील वीज पोहचणार आहे. 2021 साली श्रीलंकेने अदानी समूहाला राजधानी कोलंबो येथील पोर्ट टर्मिनल दिला होता. त्यानंतर अदानी समूहाची ही दुसरी मोठी श्रीलंकेतील गुंतवणूक आहे.
श्रीलंकेमध्ये चीनचा प्रभाव (Chines influence in Shri Lanka)
श्रीलंकेमध्ये चीनचा प्रभाव वाढत असल्याने भारतासाठी हा चिंतेचा विषय होता. भारत सरकारद्वारे अदानी समूहाचे कंत्राटदार म्हणून नामनिर्देश भारत सरकारने केले आहे. कोलंबो बंदरावरील चीनच्या टर्मिनल समोरच सुमारे दीड किलोमीटर लांबीची आणि 20 मीटर खोलीची जेट्टी उभारण्याचे काम अदानीकडून सुरू आहे.
श्रीलंकेचे ऊर्जा मंत्री कांचना वीजशेखरा यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. पवन ऊर्जा प्रकल्पाचा करार पूर्ण करण्यासाठी बुधवारी कोलंबो येथे अदानी कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्याचे वीजशेखरा यांनी सांगितले.
अदानी समूहावर घोटाळ्याचे आरोप (Fraud allegation on Adani Firm by Hindenburg)
अमेरिकेतील शॉर्ट सेलिंग फर्म हिंडनबर्गने अदानी समूहावर शेअरच्या किंमती आणि लेखा संबंधित घोटाळ्याचे गंभीर आरोप केले आहेत. या अहवालानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांचे बाजारमूल्य मोठ्या प्रमाणावर कोसळले आहे. या आरोपांचा परिणाम अदानी समूहाच्या सार्वजनिक प्रतीमेवरही झाला आहे. अनेक गुंतवणूकदारांनी अदानी समूहातील गुंतवणूक काढून घेतली. तसेच सेबीनेही या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, अदानी समूहाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हा भारतावर केलेला हल्ला असल्याचे अदानीने म्हटले आहे.