‘एफपीओ’च्या माध्यमातून देशाच्या भांडवली बाजाराच्या इतिहासातील आजवरची सर्वात मोठी रक्कम उभी करणारी म्हणून या FPO ची ओळख निर्माण झाली होती. 20 हजार कोटी रुपये इतकी मोठी ही रक्कम होती.. बुधवारी सायंकाळी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक झाली. यात FPO रद्द करत असल्याचा निर्णय घेण्यात आला. ‘‘अभूतपूर्व परिस्थिती आणि सध्याची बाजारातील अस्थिरता लक्षात घेता ‘एफपीओ’मधून मिळविलेला निधी परत करून, हा पूर्ण झालेला व्यवहार मागे घेत आहोत. या प्रक्रियेत सहभागी झालेल्या गुंतवणूकदार समुदायाच्या हिताचे रक्षण करण्याचे कंपनीचे यामागे उद्दिष्ट आहे,’’ असे कंपनीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. समभागाच्या किमतीतील इतक्या मोठ्या घासरणीचाही यात उल्लेख करण्यात आला आहे.
FPO रद्द करण्याबाबत अदानी काय म्हणाले?
अदानी एंटरप्रायझेसचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी यावर आपली भूमिका मंडळी आहे. ‘‘या परिस्थितीत ‘एफपीओ’च्या प्रक्रियेत पुढे जाणे नैतिकदृष्टय़ा योग्य होणार नाही, असे संचालक मंडळाला वाटल्याचे त्यांनी म्हटले आहे. गुंतवणूकदारांच्या हितरक्षणास सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यांना कोणत्याही संभाव्य आर्थिक नुकसानीपासून वाचवण्यासाठी संचालक मंडळाने हा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले.
अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये घसरण सुरूच
हिंडेनबर्ग अहवालात करण्यात आलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर अदानी समूहातील कंपन्यांच्या समभागात बुधवारीही घसरण सुरू राहिली. अदानी एंटरप्रायझेस तब्बल 28 टक्क्यांहून अधिक तर, अदानी पोर्ट्स 19 टक्क्यांहून अधिक गडगडला. मागील पाच सत्रांमध्ये अदानी समूहाने तब्बल 7 लाख कोटी रुपयांहून अधिक बाजार भांडवल गमावल्याचे दिसून येत आहे.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            