प्रसिद्ध उद्योगपती एलन मस्क यांनी मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात ट्विटरचा ताबा घेतला. मात्र, ट्विटरचे CEO झाल्यानंतर त्यांनी घेतलेले अनेक निर्णय वादग्रस्त ठरले आहेत. त्याचा परिणाम ट्विटरच्या उत्पन्नावर झाला आहे. अनेक जाहिरातदारांनी ट्विटरकडे पाठ फिरवली आहे. ट्विटर प्लॅटफॉर्मवर जाहिरात करणाऱ्या कंपन्यांनी 71% ट्विटरवरील जाहिरातींचे बजेट कमी केले आहे. त्याचा फटका कंपनीच्या उत्पन्नाला बसला आहे. आधीच ट्विटर तोट्यात असून जाहिरांतींपासून मिळणारे उत्पन्न रोडावल्याने कंपनीपुढील अडचणी वाढल्या आहेत.
डिसेंबरमध्ये 71 टक्के जाहिराती कमी( twitter ads revenue reduced)
डिसेंबर महिन्यात ट्विटरवर येणाऱ्या जाहिरातींमध्ये 71 टक्के कपात झाली आहे. एलन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर दिवसेंदिवस जाहिरातदारांनी ट्विटरवर जाहिरात पोस्ट करणे बंद करुन फेसबुक, इन्स्टाग्राम आणि टिकटॉक सारख्या माध्यमांना पसंती दिली आहे. स्टँडर्ड मीडिया इंडेक्स (SMI) कंपनीने याबाबत माहिती दिली आहे.
जाहिरातदारांना आकर्षित करण्यासाठी मस्क यांनी अनेक प्रलोभने देण्यास सुरुवात केली आहे. काही काळ मोफत जाहिरात देण्यात येत आहे. तसेच राजकीय जाहिरातींवरील बंदी हटवली आहे. तसेच इतरही बेनिफिट्स कंपन्यांना दिले आहेत, मात्र, तरीही ट्विटरवरील जाहिरातींचे प्रमाण वाढत नाही.
90 टक्के उत्पन्न जाहिरातीमधून (90% revenue through twitter ads)
मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात ट्विटरवर पोस्ट करण्यात येणाऱ्या जाहिरातींच्या प्रमाणात 55% कपात झाली. त्यानंतर डिसेंबर महिन्यात आणखी जाहिरातींचे प्रमाण कमी झाले. ट्विटरचा 90 टक्क्यांपेक्षा जास्त महसूल जाहिरांतीमधून येतो. मात्र, ट्विटरसाठी जाहिरात देणाऱ्या टॉप कंपन्यांनी जाहिराती देणं बंद केले आहे. ऑक्टोबरनंतर जाहिरातीतून येणाऱ्या उत्पन्नाला उतरती कळा लागल्याचे म्हटले आहे. आघाडीच्या 30 कंपन्यांपैकी चौदा कंपन्यांनी ट्विटरवर पोस्ट करण्यात येणाऱ्या जाहिराती कमी केल्या आहेत. तर चार कंपन्यांनी 90 टक्क्यांपेक्षा जास्त ट्विटर जाहिरातींसाठीचे बजेट कमी केले आहे.
मस्क यांच्या कोणत्या निर्णयाचा परिणाम उत्पन्नावर झाला? (Elon musk decsion impacted ad revenue)
एलन मस्क यांनी कंपनी ताब्यात घेतल्यानंतर निम्मे कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले. तसेच ट्विटरवर ब्लू टिकसाठी मासिक शुल्क लागू केले. यासोबतच मस्क यांनी काही पत्रकार आणि प्रतिष्ठित व्यक्तींची ट्विटर खाती अचानक बंद केली. तर काही वादग्रस्त व्यक्तींची खाती पुन्हा सुरू केली. या सर्व निर्णयांवर माध्यमांमध्ये खूप चर्चा झाली. त्यामुळे ट्विटरची प्रतिमा मलिन झाली. एलन मस्क यांनी स्वत: एक पोल घेत CEO पदावर रहावे की नाही, असा प्रश्न लोकांना विचारला. यामध्येही लोकांनी सीइओ पदावरुन पायउतार व्हावे या बाजूने कौल दिला. त्यामुळे मस्क यांनी घेतलेले निर्णय लोकांना पटले नसल्याचे यातून दिसते. त्याचाच परिणाम आता ट्विटरच्या जाहिरातींवर आणि उत्पन्नावर झाला आहे.