गेल्या काही दिवसांपासून देशभरात टोमॅटोचे भाव गगनाला भिडलेले पाहायला मिळत आहेत. घाऊक बाजारात टोमॅटोची आवक कमी झाल्यामुळे आणि मागणी वाढत चालल्यामुळे टोमॅटोचे दर वाढतच चालले आहेत. या भाववाढीचा सर्वाधिक फटका सामान्य नागरिकांना बसतो आहे. टोमॅटोच्या किरकोळ दराने 150 रुपये किलोचा टप्पा गाठलाय. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर शहरांत तर 160-180 रुपये किलो दराने देखील टोमॅटोची विक्री होते आहे.
घाऊक बाजारात टोमॅटो 100-120 रुपये दराने विकला जातो आहे. महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून टोमॅटोची आवक कमी झालेली पाहायला मिळते आहे. पुणे जिल्ह्यातील नारायणगाव हे टोमॅटोचे आगार मानले जाते. सर्वाधिक टोमॅटोची खरेदी-विक्री नारायणगाव मार्केटमध्ये होत असते. महाराष्ट्रात मार्च-एप्रिलमध्ये पडलेला अवकाळी पाऊस, लांबलेला उन्हाळा यांमुळे पिकाचे नुकसान झाले होते. याचाच परिणाम सध्या पाहायला मिळतो आहे. नारायणगावसह सातारा, सांगली, अहमदनगर, सोलापूर येथील बाजार समित्यांमध्ये देखील टोमॅटोची आवक घटली आहे.
येत्या 15 दिवसांत दिलासा मिळेल
देशभरातील नागरिक टोमॅटोच्या वाढत्या किमतीमुळे हैराण असताना सरकारी पातळीवर देखील आता याची गंभीर दखल घेतली गेली आहे. भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंग यांनी येत्या 15 दिवसांत टोमॅटोचे भाव सामान्य पातळीवर येतील आणि आवक देखील वाढेल असे म्हटले आहे.
पूर्वेकडील राज्यांमध्ये सध्या पावसाचे थैमान सुरु आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आदी राज्यातून आपल्याकडे टोमॅटो विक्रीसाठी येत असतो. मात्र पावसामुळे आणि पुरामुळे दळणवळण व्यवस्थेवर परिणाम झालाय. त्यामुळे आधीच नाशवंत असलेल्या टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत.
मुंबईत 15 रुपयाला एक टोमॅटो!
किरकोळ बाजारात टोमॅटोचे भाव वाढले असताना ग्राहक पावशेर किंवा आर्धा किलोच टोमॅटो खरेदी करत आहेत. सध्या मुंबई आणि ठाण्यात नगाप्रमाणे टोमॅटोची विक्री होत आहे. अनेक ठिकाणी एक टोमॅटो 15 रुपयांत विकला जातो आहे. वाढत्या किमतीमुळे काही ग्राहकांनी स्वयंपाकासाठी टोमॅटो प्युरीचा पर्याय स्वीकारला आहे. बाजारात 5 ते 10 रुपयांत मिळणाऱ्या टोमॅटो प्युरीचा खप वाढला असल्याचे दुकानदार सांगत आहेत.