देशभरात टोमॅटोचे भाव कडाडले आहेत. सामान्य नागरिक वाढत्या किमतीमुळे हैराण आहेत. अशातच एक महत्वाची बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील एका शेतकऱ्याने टोमॅटो विक्रीतून थोडेथोडके नाही तर तब्बल 2.8 कोटी रुपये कमावले आहेत. होय, विश्वास बसत नाहीये? पण ही बातमी अगदी खरी आहे. या शेतकऱ्याचे नाव आहे ईश्वर गायकर. ईश्वर हे जुन्नर तालुक्यातील पाचघर या गावातील एक शेतकरी आहेत. एक प्रयोगशील शेतकरी म्हणून ते ओळखले जातात. टोमॅटो विक्रीतून त्यांनी कोटींची कमाई केल्याचा दावा केलाय. संपूर्ण राज्यात सध्या हा चर्चेचा विषय बनला आहे.
बंपर उत्पादन
ईश्वर गायकर आणि त्यांची पत्नी सोनाली गायकर हे मिळून शेती करतात. बारा एकर शेतीत त्यांनी यावर्षी टोमॅटोचे पीक घेतले होते. गेल्या सहा-सात वर्षांपासून ते सातत्याने टोमॅटोचे पीक घेत आहेत. यावर्षी त्यांच्या शेतात टोमॅटोचे दमदार उत्पन्न निघाले असून त्यांनी आतापर्यंत 17,000 क्रेट विकले आहेत. सध्या देशभरात टोमॅटोचे भाव वधारले असताना त्यांच्या मालाला चांगला भाव मिळाला आहे. नारायणगाव ही टोमॅटोची एक नावाजलेली बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रात बहुतांश टोमॅटो याच बाजार समितीतून पुरवले जातात. टोमॅटोचे भाव वाढल्यानंतर आणि उत्तरेत पावसाचे थैमान सुरु झाल्यानंतर पुणे जिल्ह्यातील टोमॅटोला मागणी वाढली आहे.
ईश्वर यांच्या शेतात अजूनही 3000 ते 4000 क्रेट असून हा माल लवकरात लवकर बाजारात आणण्याचा त्यांचा विचार आहे. त्यामुळे एकूण 3.5 कोटी रुपये कमवण्याचा त्यांचा उद्देश आहे. 2021 मध्ये त्यांच्या पीकाचे प्रचंड नुकसान झाल्याचे ते सांगतात. यावेळी त्यांचे तब्बल 18 ते 20 लाखांचे नुकसान झाले होते असे सांगतात. परंतु यंदा मात्र टोमॅटोला चांगला भाव मिळत असल्याने त्यांची चांगली कमाई झाली आहे.
बंपर कमाई
ईश्वर गायकर यांनी या वर्षी 12 एकर जमिनीवर टोमॅटोची लागवड केली आणि आतापर्यंत सुमारे 17,000 क्रेट टोमॅटो 770 ते 2311 रुपये प्रति क्रेट या दराने विकले आहेत. त्यांच्या शेतात पिकलेल्या टोमॅटोची गुणवत्ता चांगली असल्यामुळे त्यांना चांगला भाव मिळाला आहे. आतापर्यंत त्यांनी टोमॅटो विक्रीतून 2.8 कोटी कमावले असून शेतात उपलब्ध असलेला माल विकून आणखी 70 लाख रुपये कमावण्याचा त्यांचा विचार आहे.