Indian Startups: गेल्या काही वर्षांत भारतात स्टार्टअप उद्योगांना मोठी चालना मिळताना दिसते आहे.'Startup India' सारख्या योजना आणि 'Mudra Loan' सारख्या अर्थसहाय्य देणाऱ्या सुविधा भारतात उद्योगवाढीसाठी महत्वाच्या ठरल्या आहेत. वेगवेगळ्या अहवालातून हे स्पष्ट झाले आहे.
एका अहवालानुसार जगातील 100 युनिकॉर्न कंपन्यांच्या यादीत 6 भारतीय स्टार्टअप्सचा देखील समावेश आहे. हुरून रिसर्च इन्स्टिट्यूटच्या ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2023 (Global Unicorn Index 2023) नुसार, स्टार्टअप युनिकॉर्नच्या वाढीसाठी भारत हे जगातले तिसऱ्या क्रमांकाचे उद्योग केंद्र म्हणून उदयास येत आहे. ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स नुसार भारतातील एकूण 68 स्टार्टअप कंपन्यांचे मूल्य 1 बिलियन डॉलरपेक्षा अधिक आहे. खरे तर भारतासाठी ही एक अभिमानास्पद बाब आहे. स्टार्टअप कंपन्यांचा विस्तार ज्या वेगाने होत आहे, त्याच वेगाने रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होत आहेत असे देखील या अहवालात म्हटले आहे. सरकारी योजना आणि धोरणांचा सकारात्मक परिणाम औद्योगिक क्षेत्रात पाहायला मिळत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. जगातील टॉप 10 युनिकॉर्न स्टार्टअपमध्ये समावेश झालेल्या 6 भारतीय कंपन्यांची यादी आणि माहिती खालीलप्रमाणे.
BYJUS'S with a valuation of $22 billion was named India's top unicorn by Hurun's Global Unicorn Index 2023. Swiggy and dream11 valued at $8 billion trailed behind the edtech startup. #byjus #swiggy #dream11 pic.twitter.com/te49GebF3d
— Illuminate- The Learning Hub of MAIMS (@IlluminateMaims) April 20, 2023
Byju's (बायजू): शैक्षणिक क्षेत्रात फार कमी कालावधीत नावारूपाला आलेल्या या स्टार्टअपने मोठी कामगिरी करून दाखवली आहे. 2011 साली बायजू रविंद्रन आणि दिव्या गोकुलनाथ यांनी सुरू केलेल्या या स्टार्टअपने डिसेंबर 2022 पर्यंत 22 अब्ज डॉलरची उलाढाल केली आहे. जागतिक स्तरावर हा स्टार्टअप 12 व्या क्रमांकावर आहे.
Swiggy (स्वीगी): 2014 साली बेंगळुरू येथून सुरू झालेला हा स्टार्टअप ऑनलाईन फूड डिलिव्हरीची सुविधा पुरवतो. देशभरातील 500 शहरांमध्ये स्वीगी सुविधा पुरवत असून, परदेशातही सेवा पुरविण्याचा कंपनीचा संकल्प आहे. स्वीगीचे एकूण मूल्य 10.7 अब्ज डॉलर इतके आहे.
OYO Rooms (ओयो रूम्स): ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2023 मध्ये ओयो रूम्सचे नाव देखील समाविष्ट आहे.2019 साली रितेश अगरवाल या भारतीय तरुणाने सुरु केलेला हा स्टार्टअप सध्या चायना, युरोप आणि अमेरिकेत देखील विस्तारला आहे. या कंपनीचे एकूण मूल्य 9 अब्ज डॉलर इतके आहे.
Dream 11 (ड्रीम 11): अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या या गेमिंग पोर्टलने करोडोंची उलाढाल केली आहे. 2008 साली मुंबईतील हर्ष जैन आणि भावित सेठ यांनी सुरु केलेला हा स्टार्टअप सध्या अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलियामध्ये देखील विस्तारला आहे. ड्रीम 11 चे एकूण मूल्य 8 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे.
Razorpay (रेझरपे): पेमेंट गेटवे Razorpay चे नाव देखील जगातील टॉप 100 युनिकॉर्नच्या यादीत समाविष्ट आहे. 2014 साली बेंगळुरू येथील शशांक कुमार आणि हर्षील माथुर यांनी सुरु केलेल्या या स्टार्टअपला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद पहायला मिळाला. या स्टार्टअपचे एकूण मूल्य 7.5 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक आहे.
Ola (ओला): वाहतूक सुविधा पुरवणारी ओला ही कंपनी भारतीय स्टार्टअप आहे हे अनेकांना माहित नाही. बेंगळूरू येथील भावेश अगरवाल आंनी अंकित भाटी या दोन तरुण उद्योजकांनी या स्टार्टअपला सुरुवात केली. वाहतूक सुविधेशिवाय ओला इतर व्यवसायात देखील उतरली आहे. भारतासह ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, इंग्लंड या देशातही स्टार्टअपचा विस्तार झाला आहे. ओलाचे एकूण मूल्य 7.5 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक आहे.
येणाऱ्या काळात स्टार्टअप उद्योगासाठी भारत देश मोठी बाजारपेठ असेल असे या अहवालात म्हटले आहे. 53 अमेरिकन युनिकॉर्नची यादी या अहवालात प्रकाशित करण्यात आली असून हे स्टार्टअप भारतीयांनी सुरु केले आहेत अशी माहिती देखील अहवालात देण्यात आली आहे.