भारताच्या हिरे उद्योगातील प्रमुख शहर म्हणजे सुरत. येथे तयार झालेल्या हिऱ्यांना अमेरिका, चीनसह जगभरात मागणी असते. सुमारे 8 लाख रोजगार या उद्योगातून मिळतो. मात्र, मागील काही दिवसांपासून जागतिक स्तरावर हिऱ्यांची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे सुरतमधील सुमारे २० हजार कर्मचाऱ्यांची नोकरी गेली आहे. कट आणि पॉलिश डायमंडची निर्मिती सुरतमध्ये केली जाते. मात्र, जागतिक मंदीच्या परिणामामुळे हिऱ्यांची मागणी कमी झाल्याने यातील उद्योग अडचणीत आले आहेत.
2008 सारखी मंदी येण्याची भीती
सुरतमध्ये पॉलिश केलेले ८० टक्के डायमंड जगभरात विक्रीसाठी जातात. सुरतमध्ये सुमारे ४ हजार हिरे उद्योगाशी संबंधित कारखाने आहेत. मात्र, मागणी कमी झाल्यामुळे कामगारांच्या हाताला काम नाही. काही कारखाने फक्त ७० ते ८० टक्के क्षमतेने चालवले जात आहेत, असे सुरत डायमंड असोशिएशनचे सचिव दमाजी मवानी म्हणतात. २००८ मध्ये ज्या प्रकारे मंदी आली होती त्याप्रमाणे या वर्षी सुरतमधील हिरे उद्योगावर संकट पुन्हा येईल की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. ऑर्डर्स कमी असल्यामुळे कामही खूप कमी आहे. काही कारखाने कामाचे दिवस कमी करत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पगारही कमी द्यावा लागेल, असे गुजरात डायमंड वर्कर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष भावेश टंक यांनी म्हटले आहे.
पॉलिश हिऱ्यांची मागणी घटली
मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यापासून हिऱ्यांची जागतिक बाजारातील मागणी कमी झाली. चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते नोव्हेंबर महिन्यादरम्यान निर्यात सुमारे साडेपाच टक्क्यांनी कमी झाली आहे. तसेच पॉलिश केलेल्या हिऱ्यांच्या किमती बाजारात कमी होत आहे. मात्र, विना पॉलिश केलेल्या हिऱ्यांच्या किमती जशाच्या तशाच आहेत. पॉलिश हिऱ्यांची मागणी कमी असल्यामुळे कामगारांनाही जास्त काम नाही. युरोप, अमेरिकेतील मंदीची भीती व्यापारी आणि हिरे उद्योजकांमध्ये निर्माण झाली आहे.
चीनमध्ये कोरोना पुन्हा डोके वर काढत आहे. रशिया-युक्रेन युद्धही संपण्याची काही चिन्हे दिसत नाहीत. भाववाढ वेगाने होत असून जागतिक स्तरावर मंदी येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे येत्या काळात सुरतमधील हिरे उद्योगात मंदी राहण्याची चिन्हे आहेत.