2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठीची किंवा बँकेत भरणा करण्याची शेवटची मुदत उद्या म्हणजेच 7 ऑक्टोबर रोजी संपते आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आधी जारी केलेल्या अधिसूचनेप्रमाणे 30 सप्टेंबरपर्यंत नागरिकांना 2 हजारांच्या नोटा बदलण्यासाठी वेळ देण्यात आली होती. मात्र लागोपाठ आलेल्या सुट्ट्या आणि बँकेची इतर कामे लक्षात घेता आरबीआयने ही मुदत 7 ऑक्टोबर 2023 पर्यंत वाढवली होती.
तुमच्याकडे देखील अजूनही 2 हजारांच्या नोटा असतील तर लवकरात लवकर बँकेत जाऊन या नोटा बदलून घेणे फायद्याचे ठरणार आहे. याचे कारण म्हणजे नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांना पुन्हा मुदतवाढ मिळणे कठीण असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
आरबीआयने 19 मे 2023 रोजी 2 हजारांच्या नोटा चलनातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. आधी 30 सप्टेंबर आणि आता 7 ऑक्टोबरपर्यंत या नोटांची कायदेशीर मान्यता कायम राहणार आहे. या मुदतीनंतर या नोटांचे काय होणार हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून स्पष्ट केले गेले नसले तरी, चलनातून या नोटा बाद झाल्यानंतर नागरिकांना त्रास सहन करावा लागु शकतो.
RBI च्या म्हणण्यानुसार, 29 सप्टेंबर 2023 पर्यंत चलनात असलेल्या 2,000 रुपयांच्या 96 टक्के नोटा बँकांमध्ये परत आल्या आहेत. म्हणजेच अजूनही 4% नोटा बाजारात कायम आहेत. या उरलेल्या नोटा उद्यापर्यंत बँकांमध्ये जमा होणे अपेक्षित आहे.
अंतिम मुदतीनंतर काय?
उद्यापर्यंतच नागरिकांना त्यांच्याकडील 2 हजारांच्या नोटा बदलून घेता येणार आहेत. त्यांनतर नागरिकांना बँकांमध्ये नोटा जमा करता येणार नाहीये. नागरिकांना आरबीआयच्या विविध 19 क्षेत्रीय कार्यालयांमधूनच त्यांच्याकडे शिल्लक असलेल्या नोटा बदलून घेता येतील. क्षेत्रीय कार्यालयात नोटा बदलून घेण्यासाठी आरबीआयने नियमावली जाहीर केली आहे. नागरिकांना एका वेळी 20,000 रुपयांपेक्षा जास्त नोटा बदलता येणार नाहीये.