गेल्या काही वर्षांपासून देशात बेरोजगारीची समस्या डोके वर काढताना दिसते आहे. देशाची अर्थव्यवस्था सुस्थितीत असतानाही रोजगार उपलब्ध नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याबाबत जाणकारांनी वेगवगेळ्या पद्धतीने विश्लेषण केले आहे. अशातच रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आणि महत्वाची बतमी आली आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात दूरसंचार क्षेत्रात नोकऱ्या निर्माण होणार आहेत. टेलीकॉम सेक्टर स्किल काउंसिल (TSSC) चे CEO म्हणाले की, या आर्थिक वर्षात सुमारे 1.26 लाख तरुणांना दूरसंचार उद्योगात नोकऱ्या मिळू शकतात.
कौशल्य आवश्यक
येत्या काळात दूरसंचार क्षेत्रात लाखो रोजगार निर्माण होणार असून त्यासाठी कुशल कर्मचारी आवश्यक आहेत. यावर्षी 5G नेटवर्कचा देशभरात प्रसार होणार असून त्यासाठी पुरेसे मनुष्यबळ देखील आवश्यक आहे. तंत्रज्ञान विषयाचे पुरेसे ज्ञान असलेल्या युवकांना यात संधी मिळणार आहे.
सेंटर ऑफ एक्सलन्स
टेलिकॉम सेक्टर स्किल कौन्सिल (TSSC) ने फिनिश टेलिकॉम गियर निर्माता नोकियाच्या सहकार्याने अहमदाबाद येथील कौशल्या-द स्किल युनिव्हर्सिटी कॅम्पस (Kaushalya- The Skill University) येथे कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी नवीन सेंटर ऑफ एक्सलन्स (Center of Excellence) स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या सेंटरच्या माध्यमातून इंडस्ट्रीला आवश्यक असलेले कुशल कर्मचारी तयार करणे, त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देणे आणि त्याचसोबत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे काम केले जाणार आहे.
या आर्थिक वर्षात TSSC देशभरातील 1.26 लाख तरुणांना प्रशिक्षण देईल आणि नंतर उद्योग स्थापन करून त्यांना तेथे रोजगार देईल, असा दावाही टीएसएससीचे सीईओ अरविंद बाली यांनी केला आहे.
प्रशिक्षणानंतर प्लेसमेंटची सुविधा
ITI कुबेरनगर येथील CoE (सेंटर ऑफ एक्सलन्स) उमेदवारांना 5G तंत्रज्ञान कौशल्यांमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य विकास केंद्राची स्थापना करत आहे. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर 4-6 आठवड्यांच्या आत किमान 70% प्रशिक्षणार्थींना प्लेसमेंट प्रदान करण्याचे केंद्राचे उद्दिष्ट आहे. प्रकल्पाच्या पहिल्या वर्षात अशा सुमारे 300 उमेदवारांना या कार्यक्रमाचा लाभ होईल असे सांगण्यात आले आहे.