झोमॅटो (Zomato) या ऑनलाइन फूड डिलिव्हरी सेवा देणाऱ्या कंपनीने बुधवारी जाहीर केले की ते खऱ्याखुऱ्या होम शेफने (Real Home Cook) तयार केलेले स्वस्त आणि ताजे जेवण उपलब्ध करून देईल. कंपनीने 'झोमॅटो एव्हरीडे' (Zomato Everyday) नावाने ही सेवा लाँच करण्याची घोषणा केली आहे, जी ग्राहकांना घरगुती जेवण ऑर्डर करण्याची सुविधा उपलब्ध करून देणार आहे.
सुरुवातीच्या काळात प्रायोगिक तत्वावर, Zomato Everyday सुविधा सध्या फक्त गुरूग्रामच्या काही निवडक भागात उपलब्ध करून देण्यात आली आहे. घरगुती बनावटीचे फ्रेश जेवण फक्त ₹89 रुपयांपासून ग्राहकांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. एका ब्लॉग पोस्टमध्ये,झोमॅटोचे संचालक दीपंदर गोयल म्हणाले की, "झोमॅटो एव्हरीडे तुम्हाला तुमच्या घरापासून दूर जावू देणार नाही.आम्ही असे जेवण उपलब्ध करून देऊ ज्याने तुम्हाला घरच्या जेवणाचा अनुभव घेता येईल."
“आमचे फूड पार्टनर होम शेफ्ससोबत सहयोग करतात, जे प्रत्येक रेसिपी प्रेमाने आणि काळजीने बनवतात आणि काही मिनिटांतच तुम्हाला घरगुती पद्धतीने बनवलेले, पौष्टिक खाद्यपदार्थ वाजवी दरात उपलब्ध करून देतात. डिश बनवताना पोषक घटकांचा वापर करून, अन्न केवळ चवदारच नाही तर प्रत्येक सर्वोत्तम गुणवत्तेची बनवली जाते आहे,” असे गोयल पुढे त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहेत.
तसेच, त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की "Zomato Everyday सादर करत आहे - तुमच्या घरापर्यंत पोचवल्या जाणार्या स्वस्त घरगुती जेवणाचा अनुभव घ्या. अस्सल होम शेफने बनवलेल्या मेनूसह! आम्हाला आशा आहे की ही सुविधा तुम्हाला तुमच्या घराची आठवण करून देईल. ❤️ येथे अधिक वाचा: https://zomato .com/blog/zomato-everyday #ZomatoEveryday".
Introducing Zomato Everyday - experience the comfort of affordable homely meals delivered to your doorsteps.
— Deepinder Goyal (@deepigoyal) February 22, 2023
With menus designed by real home chefs, we hope this reminds you a little of your home. ❤️
Read more here: https://t.co/y3FzSFBETE#ZomatoEveryday
"फक्त मेनू ब्राउझ करा, तुमचे जेवण ऑर्डर करा आणि काही मिनिटांत गरम आणि चवदार अन्न तुमच्या दारापर्यंत पोहोचेल," असे कंपनीने म्हटले आहे. झोमॅटोचे म्हणणे आहे की ही त्यांच्यासाठी एक मोठी संधी आहे जी भारतासारख्या बाजारपेठेत अद्याप वापरली गेलेली नाहीये.
झोमॅटो एव्हरीडे सुरुवातीला गुरुग्रामच्या काही परिसरातच उपलब्ध असेल. प्रायोगिक तत्वावर या सुविधेची पडताळणी केली जाणार आहे. याला ग्राहकांचा प्रतिसाद चांगला मिळाला तर इतर शहरांमध्ये देखील ही सुविधा देण्याचा कंपनीचा विचार आहे. याबाबत झोमॅटोने म्हटले आहे की, त्यांचे फूड पार्टनर घरगुती स्वयंपाकीसोबत एकत्र येतील जे ₹ 89 पासून घरच्या पद्धतीने बनवलेली मेजवानी तयार करतील.
खरे तर, यापूर्वी अशाच प्रकारच्या उत्पादनाचा प्रयत्न करणाऱ्या स्टार्टअप्सना यश आलेले नाही. एक प्रयोग म्हणून, Swiggy ने 2019 मध्ये "Swiggy Daily" हे घरगुती जेवणासाठी एक वेगळे ऍप लाँच केले. कमी मागणीमुळे हे ऍप 2020 मध्ये बंद करण्यात आले.