झोमॅटो (Zomato) या ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मला (Online Food Delivery Platform) मागचे काही दिवस ग्रहण लागलं आहे. आणि मोठ्या पदावर असलेले अधिकारी एका मागून एक कंपनी सोडून जात आहेत. त्यात नवीन भर पडली आहे ती कंपनीचे सहसंस्थापक (Cofounder) आणि मुख्य तांत्रिक अधिकारी गुंजन पाटिदार (Gunjan Patidar) यांची. मागची चौदा वर्षं ते झोमॅटोबरोबर होते. आणि कंपनीचं अॅप आणि इतर तांत्रिक गोष्टी उभ्या करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.
त्यांच्याच अध्यक्षतेखाली कंपनीची तंत्रज्ञान विषयक टीमही उभी राहिली. गुंजन पाटिदार कंपनी सोडून गेल्याची बातमी झोमॅटोनं 2 जानेवारीला शेअर बाजाराला कळवली आहे. ‘गुंजन पाटिदार यांचा व्यवस्थापकीय कामांमध्ये सहभाग नव्हता. त्यामुळे दैनंदिन कामांमध्ये कंपनीला काही अडचण येणार नाही,’ असं झोमॅटोने मुंबई स्टॉक एक्सचेंजला कळवलं आहे.
गुंजन पाटिदार कंपनीच्या स्थापनेपासून कंपनीबरोबर होते. आणि आणखी एक सहसंस्थापक दीपेंदर गोयल यांच्याबरोबर दिल्ली आयआयटीमधून त्यांनी अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलं होतं. झोमॅटो कंपनी अलीकडे तोट्यात आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी अलीकडेच नोकर कपातही जाहीर केली आहे. त्यानंतर कंपनीतले बरेच उच्चपदस्थ अधिकारी सोडून जात आहेत.
गुंजन यांच्यापूर्वी काही आठवडे आणखी एक संस्थापक मोहीत गुप्ता यांनी कंपनी सोडली होती. तर राहुल गुंजू आणि सिद्धार्थ झवर यांनीही झोमॅटो सोडून दुसऱ्या टेक कंपनीत नोकरी धरली. या अंतर्गत घडामोडी आणि विस्तारामुळे नफ्यावर पडलेला ताण यामुळे शेअर बाजारातही कंपनीचं नुकसान झालं आहे. 2022 मध्ये कंपनीची शेअर किंमत 50% नी घटली. सध्या झोमॅटोचा शेअर 60 रुपयांच्या आसपास आहे. तर कंपनीचा तिमाही तोटा 253 कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे.