भारतातील बहुसंख्य लोक नोकरी करतात. त्यातील अनेकांचे पगार फारच कमी आहेत. त्यामुळे जबाबदारी सांभाळून आर्थिक गुंतवणूक (Financial Investment) करणे, त्यांच्यासाठी कठीण जाते. मात्र पगार कितीही कमी असला, तरीही कमी जास्त प्रमाणात का असेना, आर्थिक गुंतवणूक करणे गरजेचे आहे. "थेंबे थेंबे तळे साचे" या म्हणीप्रमाणे आर्थिक गुंतवणूक करताना छोट्या स्वरूपातील गुंतवणूक योजनांपासून केलेली सुरुवात मोठा फंड तयार करण्यासाठी मदत करते. मात्र आर्थिक गुंतवणुकीचा श्रीगणेशा करण्यापूर्वी आयुष्य सुरक्षित करणे गरजेचे आहे. त्यासाठी विमा संरक्षण घेणे गरजेचे आहे. त्यानंतरच आर्थिक गुंतवणुकीला सुरुवात करावी.
Table of contents [Show]
टर्म इन्शुरन्स (Term Insurance)
तुमचा पगार कितीही कमी असला, तरीही तुम्ही टर्म इन्शुरन्स (Term Insurance) काढणे गरजेचे आहे. हा इन्शुरन्स अतिशय कमी प्रीमियममध्ये काढला जातो. तुमचे वय जितके कमी असेल, तितकी या प्रीमियमची किंमत कमी असते. वय जसजसे वाढेल, तसे प्रीमियमची किंमत वाढत जाते. सध्या बाजारात अनेक वेगवेगळ्या कंपन्यांचे टर्म इन्शुरन्स उपलब्ध आहेत. हे टर्म इन्शुरन्स 1 कोटी रुपयांपर्यंत किंवा त्याहून अधिक आर्थिक संरक्षण देतात.
टर्म इन्शुरन्स काढल्यामुळे पॉलिसीधारकाचा अचानक मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षा प्राप्त होते. या इन्शुरन्समधील रक्कम पॉलिसीधारकाच्या कुटुंबाला दिली जाते. ज्याच्यामुळे त्याच्या कुटुंबाला पुढील जीवन जगण्यासाठी मदत होते. नवीन नोकरी लागल्यानंतर किंवा पगार कमी असला तरीही प्रत्येकाने टर्म इन्शुरन्स काढून आपल्या कुटुंबाचे आर्थिक जीवन सुरक्षित करणे गरजेचे आहे. यामध्ये पॉलिसीधारकाला कोणताही फायदा मिळत नाही,परंतू त्याच्या टर्म इन्शुरन्समधील गुंतवणुकीमुळे त्याचे कुटुंब सुरक्षित आयुष्य जगू शकते.
हेल्थ इन्शुरन्स (Health Insurance)
टर्म इन्शुरन्सनंतर गुंतवणूक करताना हेल्थ इन्शुरन्स (Health Insurance) काढणे गरजेचे आहे. हेल्थ इन्शुरन्सला मराठीमध्ये 'आरोग्य विमा'असे म्हणतात. सध्या प्रत्येकाच्या आरोग्याच्या काही ना काही तक्रारी आपल्याला पाहायला मिळतात. आपण निदृढ राहू याची खात्री कोणीही देऊ शकत नाही. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याची आणि कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी हेल्थ इन्शुरन्स काढणे गरजेचे आहे.
हा इन्शुरन्स वैयक्तिक (Personal Health Insurance) आणि कौटुंबिक (Group Health Insurance) अशा दोन्ही प्रकारांमध्ये काढता येतो. अनेकजण कौटुंबिक हेल्थ इन्शुरन्स काढून आपल्या कुटुंबाची वैद्यकीय सुरक्षा भक्कम करतात. वैद्यकीय आपत्तीमध्ये हा विमा कामी येतो आणि तुमच्या आर्थिक खर्चावर नियंत्रण मिळवतो. सध्या बाजारात अनेक हेल्थ इन्शुरन्स कंपन्या कार्यरत आहेत. मासिक 200 रुपये प्रीमियममध्ये हेल्थ इन्शुरन्स काढला जाऊ शकतो.
विमा संरक्षण घेतल्यानंतरही, कमी पगारात आर्थिक गुंतवणूक करता येते. ही गुंतवणूक करण्यासाठी पीपीएफ आणि एसआयपी हे दोन उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. दीर्घकालीन आणि कमी रकमेत ही गुंतवणूक सुरु करता येते.
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना (PPF)
भारत सरकारने 1968 साली सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेची (PPF) सुरुवात केली. लोकांना आर्थिक गुंतवणुकीची सवय लागावी, या हेतूने ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेतील पीपीएफ खाते पोस्ट ऑफिस आणि विविध बँकांमध्ये ओपन करता येते. या योजनेत गुंतवणूकदार किमान 500 रुपये तर कमाल 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता.
सध्या या योजनेत 7.1% वार्षिक व्याजदर (Interest Rate) दिला जात आहे. तुमचा पगार कितीही कमी असला तरीही तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकता. ही योजना दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी फायद्याची ठरणार आहे. या योजनेत 15 वर्षासाठी सलग गुंतवणूक करून मॅच्युरिटीवेळी मोठा फंड तयार करता येऊ शकतो.
एसआयपी (SIP)
सध्या गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध असले, तरीही सर्वाधिक परतावा मिळवण्यासाठी म्युच्युअल फंडातील एसआयपीमध्ये (SIP) बहुसंख्य लोक गुंतवणूक करताना पाहायला मिळत आहेत. ही गुंतवणूक बाजारातील जोखमीच्या अंतर्गत येते. एसआयपीमध्ये लोक मासिक आधारावर ठराविक रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवू शकतात. ही रक्कम किमान 500 रुपयांपासून सुरू होते. याची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही.
एसआयपीमध्ये जितक्या दीर्घकाळासाठी गुंतवणूक करता येईल त्यावर मिळणारा परतावा ही तितकाच जास्त असणार आहे. म्युच्युअल फंडातील एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही आर्थिक तज्ञांचा सल्ला नक्की घ्यायला हवा. तुमचा पगार कितीही कमी असला तरी तुम्ही केवळ 500 रुपयांपासून एसआयपी सुरू करू शकता.