Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Farmer’s Success Story: बाकीच्यांनी मिरची उपटून फेकली, आणि ‘या’ तरुण शेतकऱ्याने मिळवला पाऊण एकरात 2,25,000 रुपये नफा

Farmer

Farmer’s Success Story: सतत चार हंगाम शेतीत नुकसानच होत होतं. कधी पिकावर रोग पडला तर कधी पीक वाकलं. पण, प्रत्येक हंगामात नवे प्रयोग करत आणि मागच्या चुकांमधून शिकत त्याने मिरची लागवडीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला. 45,000 रुपयांच्या लागवड खर्चावर 6 महिन्यात कमावले 252200 रुपये, जाणून घ्या शेतकऱ्याची यशोगाथा.

Farmer’s Success Story: एकतर लहरी हवामानामुळे शेतीचं नुकसान झाले किंवा पीक आलंच तरी त्याला भाव मिळण्याची शाश्वती नाही, अशा दुष्टचक्रात भारतीय शेतकरी (Indian farmers) मागची कित्येक वर्षं अडकलाय. यंदाही हवामानातला बदल (Climate Change) आणि अवेळी पावसामुळे राज्यात अनेक भागात शेतकऱ्यांना मिरचीचं (Chilly Cultivation) पीक घेता आलं नाही. मिरची वाढत असताना रोग लागला आणि मिरचीचं रोप उपटून फेकावं लागलं अशी शेतकऱ्यांची अवस्था होती. पण, अशा परिस्थितीत, अमरावतीत (Amravati) एका तरुण शेतकऱ्याने लागवडीची नवी पद्धत राबवून सहा महिन्यांत सव्वा दोन लाख रुपयांचा नफा मिळवून दाखवला.

वडील आजारी पडले आणि 19 व्या वर्षी आली शेतीची जबाबदारी 

विदर्भात (Vidarbha), अमरावती जिल्ह्यातला वरुड (Warud) तालुका खरंतर संत्र्यांसाठी प्रसिद्ध. आपण नागपूरला (Nagpur) संत्रानगरी म्हणून ओळखतो. पण, जाणकार लोक अमरावतीच्या संत्र्यांनाच पहिली पसंती देतात. इथल्या वाडेगावच्या (Wadegaon) वैभव साबळेनं (Vaibhav Sable) मात्र मागची चार वर्षं शेतात मिरची, बटाटा आणि कापसावर प्रयोग केले. आणि अथक मेहनतीनंतर चौथ्या वर्षी मिरचीची लागवड यशस्वी करून दाखवली.

वैभव बारावीत होता तेव्हा त्याचे शेतकरी वडील संजय साबळे (Sanjay Sable) आजारी पडले. वडिलांच्या आजारपणात आई एकटी शेतात राबत होती. मजूर मिळाले नाहीत, तर अख्खी कामं एकटी करत होती. ते पाहून लहान वयातच वैभवने शेतीची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. शेतीची आवड आणि लहानपणापासून दोन एकर जमिनीवर आई-वडील करत असलेले कष्टही तो बघत आला होता.

vaibhavs-mom-is-doing-farming.jpg

पण, आताचं आव्हान निराळं होतं. वडील शेतावर राबत होते तेव्हापासून आपल्या दोन एकर जमिनीवर ते मिरची, कापूस आणि बटाट्याची लागवड करत आले होते. पण, त्यात कुटुंबाचं जेमतेम पोट भरत होतं. आईच्या पाठिंब्याने वैभवने नवीन हंगामातही लागवड सुरूच ठेवली. पण, पद्धत बदलावी लागणार याचा अंदाज दुसऱ्याच वर्षी त्यांना आला. आणि पहिल्या अनुभवातून जन्माला आली मिरची लागवडीची आधुनिक पद्धत.

ड्रीप सिंचन आणि खताचा सुयोग्य वापर 

वैभवने दोन एकर शेतापैकी एका एकरात कापूस आणि उर्वरित एका एकरात मिरची आणि बटाट्याचं पीक घ्यायचं ठरवलं. 2022 च्या जुलै महिन्यात त्यांनी मिरचीची रोपं लावली. यावेळी पावसाची अनियमितता लक्षात घेऊन त्यांनी ठिबक सिंचन म्हणजे ड्रिप इरिगेशनचा (Drip irrigation) पर्याय स्वीकारला. आणि लागवडीनंतर सात दिवसानंतर  पिकाला अगदी मूळाशी खत दिलं.

‘पिकाला पाणी आणि खत अगदी मूळाशी मिळावं, इथे तिथे पडून ते वाया जाऊ नये यासाठी मी ठिबक सिंचन बसवलं. आणि खतंही रोजच्या रोज एका ठरावीक पद्धतीने दिलं. आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे अनुभव, माझे दोन वर्षांतले अनुभव याचा विचार करून ही पद्धत मी बनवली,’ असं वैभवने महामनीशी बोलताना सांगितलं.

लागवडीच्या सात दिवसांनंतर त्याने रोपाला खत दिलं. त्यानंतर मिरचीच्या रोपाची वाढ सुरू झाली. पाणी आणि खताचं सुयोग्य मिश्रण हेच मिरची लागवडीच्या यशामागचं गमक असल्याचं वैभव सांगतो. ‘शेतातली वीज आठवड्यातून तीन दिवस रात्री आणि दोन दिवस दुपारी असते. त्यामुळे तीन दिवस रात्री शेतातच मुक्काम केला. पण, पाण्याचं गणित बिघडू दिलं नाही. वडीलही कधी कधी रात्री शेतावर राहायचे,’ वैभवने आपले लागवडीचे दिवसच आमच्यासमोर उभे केले.

on-the-method-of-vaibhav-what-do-the-experts-say-2.jpg

पण, याचा परिणाम असा झाला की, तालुक्यात आजूबाजूच्या काही शेतकऱ्यांचं मिरचीमुळे नुकसान झालेलं असताना वैभवने मात्र त्याच पिकातून चांगला नफा कमावला. शेजारचेच एक शेतकरी निलेश दाभाडे महामनीशी बोलताना सांगतात, ‘मी ही जुलैमध्येच मिरची लावली होती. पण, पाऊस आणि लागवडीच्या चुकीच्या पद्धतीमुळे नोव्हेंबरमध्येच मला मिरची उपटून फेकून द्यावी लागली. पण, वैभवने मात्र काही वर्षं प्रयोग करून लागवडीची पदधत शोधून काढली.’

वैभवची हुशारी ही की, रोपाच्या मूळापर्यंत खत आणि पाणी जावं यासाठी त्याने प्रयत्न केला. आणि त्यासाठी ठिबक सिंचन आणि खताचं योग्य नियोजन केलं. हातुर्णा कृषि विद्यापीठातले प्राध्यापक श्यामसुंदर ताथोडे यांनीही वैभवच्या लागवड पद्धतीतल्या काही खुबी सांगितल्या. ‘मिरचीचं पीक घेताना योग्य जमिनीची निवड जास्त महत्त्वाची. जमिनीत चुनखडी असेल तर पिकाला बाधा होते. शिवाय बेड आणि मंचिंगही महत्त्वाचं. त्यामुळे पावसाच्या पाण्यात मिरचीचं पीक वाकत नाही. वैभवने या सगळ्या गोष्टींवर कटाक्षाने लक्ष दिलं. मिरचीचं वाण, जमिनीची निवड आणि ठिबक सिंचन या सगळ्यामुळे मिरची बहरून आली,' असं ताथोडे म्हणाले. ’ 

chili-farming-1-1.jpg
सौजन्य - वैभव साबळे

5 किलोमीटरवर मिरचीची बाजारपेठ 

अमरावतीमध्ये मिरची पारंपरिक पिकांमध्ये मोडत असली तरी अलीकडे शेतकऱ्यांचा लागवडीचा अनुभव चांगला नव्हता. अवेळी पाऊस आणि मोठ्या झाडांची सावली मिरची पिकासाठी मारक ठरत होते. हळूहळू शेतकऱ्यांनी मिरची लागवडच कमी केली.

पण, मिरचीच्या रोपाची खरी गरज समजल्यावर वैभव यांचा लागवडीचा प्रयोग मात्र प्रमाणाबाहेर यशस्वी झाला. वैभव यांचं आणखी एक गणित यशस्वी झालं ते बाजारपेठेचं. वरुड तालुक्यातली मिरची बाजारपेठ त्यांच्यापासून अगदी पाच किलोमीटरवर आहे. आणि काटेकोर नियोजनामुळे शेतीचा खर्चही आटोक्यात होता.

लागवडीपासून ते मिरची बाजारपेठेत आणण्यापर्यंत वैभवला 45,000 रुपये इतकाच खर्च आला. आणि जानेवारीपर्यंत मजुरी, तोडणी असा खर्च जाता त्यांच्या हातात 2,52,200 रुपये पडले होते. कृषि तज्ज्ञ ताथोडे यांच्या मते मिरची लागवडीची ही पद्धत कुठल्याही भागात वापरता येऊ शकते. ‘लागवडीची पद्धत तसंच मिरचीच्या बरोबर आणखी कुठलं पीक शेतकरी घेतो यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. संत्रा लागवडही आजूबाजूला होता कामा नये. त्यामुळे संत्र्याची सावली पडून मिरची अन्न तयार करू शकत नाही. या काही गोष्टी पाळल्या तर राज्यात कुठेही मिरची लागवड यशस्वी करता येऊ शकते. ’ ताथोडे यांनी सांगितलं. 

वैभवने वरूड तालुक्यात मिरची लागवड यशस्वी करून दाखवून आता जिल्ह्यात नाव कमावलंय. आणि त्यामुळे शेतीत नवीन प्रयोग करण्याचा त्याचा हुरुपही वाढलाय.