भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी विविध सुविधा (Services) पुरवत असते. प्रवास आरामदायी व्हावा, हा यामागचा हेतू असतो. सण उत्सवाचा काळ तसंच उन्हाळ्यात विशेष गाड्या (Special train) चालवून प्रवाशांना दिलासा दिला जातो. तिकीट बुकिंग (Ticket booking) आणि इतर सुविधा वेळोवेळी दिल्या जात असतात. मात्र या तर सामान्य सेवा आहेत. याबद्दल बहुतांश सर्वच प्रवाशांना माहिती असते. मात्र रेल्वेच्या अशा अनेक सुविधा आहेत, ज्याबाबत प्रवाशांना फारशी माहिती नसते. आज आम्ही अशाच एका सुविधेबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.
हॉटेल शोधण्याची गरज नाही
रेल्वेनं प्रवास करत असाल आणि काही कारणास्तव तुम्हाला रेल्वे स्टेशनवरच राहावं लागणार असेल तर अशावेळी तुम्हाला स्टेशनवरच एक खोली मिळू शकेल. यासाठी तुम्हाला बाहेर जाण्याची किंवा कोणतंही हॉटेल शोधण्याची गरज राहणार नाही. अतिशय कमी किंमतीत या खोल्या उपलब्ध असणार आहेत. किती रुपयांत या खोल्या उपलब्ध असतील तसंच तुम्ही याचं बुकिंग कसं करू शकाल याची माहिती घेऊ...
फक्त 100 रुपयांमध्ये सुसज्ज रूम
रेल्वे स्थानकावर प्रवाशांना राहण्यासाठी हॉटेलसारख्या खोल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. वातानुकूलित अशी ही एक खोली असणार आहे. यामध्ये झोपण्यासाठी बेड आणि रूमच्या सर्व गरजेच्या गोष्टी उपलब्ध असतील. रात्रभर रूम बुक करण्यासाठी तुम्हाला 100 ते 700 रुपये द्यावे लागणार आहेत.
बुकिंग कसं करावं?
- रेल्वे स्टेशनवर हॉटेलसारखी खोली जर तुम्हाला बुक करायची असेल, तर हे टप्पे महत्त्वाचे आहेत.
- सर्वात आधी तुमचं आयआरसीटीसी अकाउंट ओपन करा
- आता लॉगिन करा आणि माय बुकिंग वर जावं
- रिटायरिंग रूमचा पर्याय तुमच्या तिकीट बुकिंगच्या तळाशी दिसेल
- याठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला रूम बुक करण्याचा पर्याय दिसेल
- पीएनआर नंबर टाकण्याची गरज नाही
- मात्र काही वैयक्तिक माहिती आणि प्रवासाची माहिती भरावी लागेल
- पैसे भरल्यानंतर तुमची खोली बुक केली जाईल
विशेष म्हणजे रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी सध्या अनेक विशेष गाड्या चालवत आहे. ज्यामुळे प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळू शकेल. त्याचबरोबर 18 उन्हाळी विशेष गाड्यांचा कालावधीही वाढवण्यात आला आहे. अशात जर तुम्हाला रेल्वे स्टेशनवर मुक्काम करण्याची वेळ आली तर हॉटेल शोधण्याची गरज नाही. तर स्टेशनवरच सुसज्ज अशी खोली मिळणार आहे.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            